मागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. परिणामी, खडकवासला धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आला असून, रविवारी 18,483 क्युसेक्सने सुरू असलेला विसर्ग सोमवारी सकाळपासून 22,121 क्युसेक्सवर नेण्यात आला आहे.
पुण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरण क्षेत्रांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण साठा 26.54 टीएमसीवर पोहोचला असून, तो सुमारे 91 टक्के भरलेला आहे. हा साठा मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 3 टीएमसीने अधिक आहे.
सध्या विविध धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे —
खडकवासला : 22,121 क्युसेक्स
वरसगाव : 9,074 क्युसेक्स
पानशेत : 5,688 क्युसेक्स
या धरणांतील विसर्गामुळे मुठा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. परिणामी, आधीच मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीसाठी बंद असलेला भिडे पूल आता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. तसेच नदीकाठच्या इतर भागांतील पूल आणि रस्ते देखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात आले आहेत.
यंदाच्या पावसाळ्यातील हा सर्वात मोठा विसर्ग मानला जात असून, हवामान विभागाने पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, नदीपात्राच्या आसपासच्या भागांत न जाण्याचा सल्ला दिला आहे. आवश्यक असल्यास नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.