पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पार्श्वभूमीवर काल उशिरा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांमध्ये महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बैठक बंद दरवाजामागे पार पडली असून, दोन्ही बाजूंनी प्रमुख नेते उपस्थित होते.
शरद पवार गटाकडून खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार सहभागी झाले होते, तर अजित पवार गटाकडून अजित गव्हाणे बैठकीला उपस्थित होते. सुमारे तासभर चाललेल्या चर्चेत प्रामुख्याने जागावाटपाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. कोणत्या प्रभागात कोणाचा उमेदवार असावा, यावरून दोन्ही बाजूंमध्ये जोरदार चर्चा झाली.
अजित पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांच्या जागांवर शरद पवार गटाकडूनही दावा करण्यात आल्याने वाद निर्माण झाल्याचे समजते. तसेच महाविकास आघाडीतील इतर पक्षांना या समीकरणात सामील करून घ्यायचे का, यावरही सविस्तर चर्चा झाली.
बैठक संपल्यानंतर अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता थेट पुण्याकडे रवाना झाले. आता पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या शक्यतेवर पुढील चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ही माहिती बैठकीला उपस्थित असलेले अजित पवार गटाचे नेते अजित गव्हाणे यांनी दिली असून, पिंपरी-चिंचवडमधील राजकारण आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपल्याचे चित्र दिसत आहे.