रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच भारतात दाखल होत असून आगामी दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान अनेक महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे. भारतावर अमेरिकेने लावलेल्या टॅरिफबाबत विचारले असता पुतिन यांनी म्हटलं की, “नरेंद्र मोदी हे दबावाखाली वाकणारे नेते नाहीत.”
मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा
भारत दौऱ्यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत पुतिन यांनी मोदींच्या ठाम नेतृत्वाचे कौतुक केले. भारताची स्वतंत्र परराष्ट्रनीती आणि जागतिक पातळीवरील सक्षम भूमिका त्यांनी अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, भारत–रशिया यातील 90 टक्क्यांपेक्षा जास्त व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण होतात, यावरून दोन्ही देशांतील मजबूत संबंध स्पष्ट दिसतात.
इतिहासातील दृढ मैत्रीवर भर
पुतिन यांनी भारत आणि रशियातील दशकांपासूनचे सहकार्य, संरक्षण क्षेत्रातील सहयोग व ऊर्जाक्षेत्रातील करारांचा उल्लेख केला. स्वातंत्र्यानंतर भारताने केलेल्या झपाट्याने विकासाचेही त्यांनी कौतुक केले.
दहावा भारतदौरा
पुतिन यांचा हा दहावा भारत दौरा असून मोदींच्या कार्यकाळात ते तिसऱ्यांदा येत आहेत. रशिया–युक्रेन युद्धानंतरचा हा त्यांचा पहिलाच भारत प्रवास असल्याने जागतिक पातळीवरही या भेटीकडे विशेष लक्ष आहे.
पुतिन यांच्या दौऱ्याचे वेळापत्रक
4 डिसेंबर 2025
सायं 6:35 — दिल्ली आगमन
5 डिसेंबर 2025
सकाळी 11:00 — राष्ट्रपती भवनात स्वागत
11:30 — राजघाट येथे महात्मा गांधींना अभिवादन
11:50 — पंतप्रधान मोदींसोबत हैदराबाद हाऊस मध्ये चर्चा
1:50 — संयुक्त पत्रकार परिषद
7:00 — राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट
9:00 — रशियाकडे प्रस्थान