सध्या काँग्रेसची देशभरात भारत जोडो यात्रा सुरु आहे. राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वात सुरु असलेली ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. 'भारत जोडो' पदयात्रा १६ नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातून अकोला जिल्ह्यात दाखल होणार आहेत. मात्र, राहुल गांधी वाशिममधून अकोला जिल्ह्यात प्रवेश करताना मेडशी ते पातुरदरम्यानचा १६ किलोमीटरचा प्रवास चारचाकी वाहनाने करणार आहेत.
राहुल गांधी हे १६ किलोमीटर चारचाकीने का प्रवास करणार आहेत. याचे कारण सुद्धा समोर आले आहे. मेडशी ते पातूरदरम्यान जंगलाचा परिसर आहे. तसेच हा रस्ताही लहान आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीवे सुरक्षा यंत्रणांनी त्यांना गाडीतून प्रवास करण्याची विनंती केली. राहुल गांधीं यांना सीआरपीएफची झेड प्लस सुरक्षा आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीआरपीएफने हा १६ किमीचा प्रवास चारचाकी वाहनाने करण्याची विनंती केली होती. ती विनंती राहुल गांधी यांनी मान्य केल्याची माहिती आहे. यामुळं वन विभागाच्या क्षेत्रात येणाऱ्या मार्गावरील काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचा 'भारत जोडो' यात्रेतील प्रवास चारचाकी वाहनाने असणार आहे.
वाशिम जिल्ह्यातील मेडशी ते पातूरपर्यंतच्या वन विभागाच्या क्षेत्रातून राहुल गांधी हे वाहनाने प्रवास करून १६ नोव्हेंबरला सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पातूर इथे दाखल होणार आहे. या यात्रेचा अकोला जिल्ह्यातून तब्बल ४५ कि.मी.चा प्रवास असणार आहे, यात्रेदरम्यान गांधी यांच्याशी संवाद साधण्यासाठी विद्यार्थी, कामगारांसह अनेक संघटनांचे प्रस्ताव आलेत. अशी माहिती काँग्रेसच्यावतीने देण्यात आली.