विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकहाती सत्ता मिळाली. नुकतच महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाविकास आघाडीकडून ईव्हीएम मशिनवर आक्षेप घेण्यात आला. सोलापुरातील मारकडवाडी येथे ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर अभिरूप मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासनाने ही मागणी फेटाळली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी मारकडवाडी येथे येणार आहेत.
महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी ईव्हीएम मशिन आणि निवडणूक आयोगाच्या मतदान प्रक्रियेवरही शंका उपस्थित केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केले. दरम्यान, सोलापुरातील मारकडवाडीतील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला. तसेच बॅलेट पेपरवर अभिरूप मतदान करण्याचे ठरवले होते. मात्र, पोलीस प्रशासनाने जमावबंदीचे आदेश दाखवत गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर हे अभिरुप मतदान रद्द करण्यात आलं. ईव्हीएम मशिनबाबत आक्षेप घेत विरोधकांनी हा विषय उचलून धरला. तसेच महायुतीच्या शपथविधीदिनी पुण्यात आंदोलन केलं.
काँग्रेस नेते राहुल गांधी सोलापुरातील मारकडवाडीत येणार आहेत. राहुल गांधी ईव्हीएम विरोधात लाँग मार्च काढणार आहेत. मारकडवाडीतील ग्रामस्थांनी ईव्हीएमवरील मतदानावर आक्षेप घेतला आहे. काही दिवसांपूर्वी सोलापुरातील मारकडवाडीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता. मात्र प्रशासनाकडून ही मागणी फेटाळण्यात आली. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी हे मारकडवाडीतून ईव्हीएम विरोधात लाँग मार्च काढणार आहेत.
मारकडवाडीत काय घडलं?
आमदार उत्तम जानकर हे 2009 पासून माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यंदा मारकडवाडीमधून जानकरांना कमी मतं मिळाल्याचं समोर आलं. यावर स्थानिकांनी आक्षेप घेतला. ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोप करत मारकडवाडीकरांनी बॅलेट पेपरवर अभिरूप मतदानाचा निर्धार केला होता. गोळ्या जरी घातल्या तरी मतपत्रिकेवर मतदान घेणारच असा एल्गार मारकडवाडीकरांनी केला होता.
मारकडवाडीकरांचा हा रौद्रावतार पाहिल्यानंतर पोलीसांनी जमावबंदीच्या आदेशाकडे बोट दाखवत गुन्हे दाखल करण्याची घोषणा करून टाकली. तर पोलिस मतदारांवर दबाव टाकत आहेत असा आरोप आमदार उत्तम जानकर यांनी केला होता. यानंतर पोलीस आणि आमदार उत्तम जानकर यांच्यात चर्चाही झाली. आमदार जानकर यांनी ग्रामस्थांसोबत देखील चर्चा केली. आणि अखेर बॅलेट पेपरवर अभिरूप मतदान रद्द करण्यात आले.