काँग्रेस नेते राहुल गांधी परभणीत दाखल झाले आहेत. न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेत आहेत. परभणी जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी काँग्रेसचे सर्व महत्वाचे नेते राहुल गांधींसोबत परभणीत दाखल झाले आहेत. शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली होती. त्यानंतर आता राहुल गांधीसुद्धा परभणीत आले आहेत.
काय म्हणाले राहुल गांधी?
आपण पोस्टमार्टम रिपोर्टस, व्हिडिओ, फोटोग्राफ्स पाहिले, त्यामधून स्पष्ट कळतं की ही सेंट पर्सेंट कस्टोडियल डेथ आहे. पोलिसांनीच सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या केली. ते दलित असल्यामुळेच त्यांना मारण्यात आलं. ते संविधानाचं रक्षण करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा संविधानाला संपवण्याची आहे. ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांना शिक्षा व्हावी. आपण स्पष्टपणे सांगत आहोत की यांना मारण्यात आलं आणि सूर्यवंशी यांची हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी जे स्पष्टीकरण दिलं त्यामुळे ते स्वत: त्यास जबाबदार आहेत.
राहुल गांधी यांचं नेमकं वक्तव्य पाहण्यासाठी क्लिक करा-
राहुल गांधींनी घेतली विजय वाकोडेंच्या कुटुंबियांची भेट
राहुल गांधी यांनी विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्यसंस्कारावेळी वाकोडे यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीनंतर राहुल गांधी यांनी वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. आंबेडकरी चळवळीतील दिवंगत नेते विजय वाकोडे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. एका माथेफिरू इसमाने या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. ही घटना समोर येताच शहरातील आंबेडकरी अनुयायी संतापले आणि त्यांनी रेल्वे रोको तसेच रस्ता रोको केला. तर, दुसऱ्या दिवशी आंबेडकर अनुयायी पुन्हा रस्त्यावर आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर होतं. पण त्यानंतर परभणीत जाळपोळ झाली, दगडफेकही करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी काहींना ताब्यात घेतलं होतं.
त्यामध्येच सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. 14 तारखेलाच सोमनाथ यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. मात्र रविवारी 15 डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांनी केला आहे. पण पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.