स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात एक गाणं म्हटले. हे गाणं सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल असून कुणाल कामरा आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कुणाल कामराच्याविरोधात आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे.
यातच आता शिवसेना नेते राहुल कनाल यांनी कुणाल कामरावर गंभीर आरोप केला आहे. कुणाल कामराच्या यूट्यूब चॅनलला दहशतवादी संघटनांकडून फंडिंग केलं जात असल्याचा आरोप राहुल कनाल यांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, "एखाद्याला रिक्षावाल्या म्हणण्यासाठी जर परदेशातून फंडिंग होत असेल तर कठिण आहे. आम्ही रोज रिक्शावाल्या, रिक्षावाल्या म्हणू आम्हाला कोण फंडिग करतंय का बघू. एका रिक्शावाल्यावर गाणं करण्यासाठी जर कोणाला परदेशातून फंडिग होत असेल तर ट्रम्प यांना विचारावं लागेल की, तुम्ही फंडिग केलंय का? परदेशातून कुणीही एखादा चाहता पैसे पाठवत असेल तुम्हाला नाही का मिळत? तुमचे परदेश दौरे कशावर चाललेत. तानाजी सावंत यांचा मुलगा 80 लाख रुपये खर्च करुन बँकॉकला गेला ना. मग त्याला परदेशी फंडिग म्हणायचे का?" असे संजय राऊत म्हणाले.