रायगड किल्ल्याच्या जवळील 'छत्र निजामपूर' या ग्रामपंचायतीच्या नावात बदल करण्याची मागणी सध्या जोरात सुरू आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी 'रायगडवाडी' असे नाव देण्याची शिफारस करत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या परिसरात निजामशाहीशी संबंधित नाव असणे, हा इतिहासाचा अपमान आहे.
पडळकर यांनी स्पष्ट केलं की, "रायगड हा संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहे. शिवरायांच्या स्वराज्याचे हे केंद्र आहे, आणि त्या परिसरात 'निजाम'सारख्या परकीय राजवटीच्या आठवणी ठेवणं योग्य नाही." त्यांचं म्हणणं आहे की या परिसरात निजामशाही, आदिलशाही किंवा मुघलशाहीशी संबंधित कोणतेही नाव असू नये. त्यामुळे 'छत्र निजामपूर' या नावाला बदलून 'रायगडवाडी' करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या मागणीला स्थानिकांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे. काहींनी नामांतराला पाठिंबा दर्शवला असला, तरी काही ग्रामस्थांनी या विषयावर राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे. नामांतराचं समर्थन करताना काहींनी सांगितलेली दंतकथा देखील चर्चेत आली आहे. एका कथेनुसार, वाऱ्याच्या झोतामुळे मावळा छत्र धरून उडत निजामपूरच्या जंगलात उतरला, म्हणून 'छत्री निजामपूर' हे नाव पडलं.
दुसऱ्या कथेनुसार, शिवकालात येथे अन्नछत्र असायचं, आणि कोकणातून येणाऱ्या वाटेवर ही विश्रांतीची जागा म्हणून ओळखली जात होती. या नामांतराचा मुद्दा पडळकर पावसाळी अधिवेशनात अधिकृतपणे उपस्थित करणार आहेत. त्यामुळे सरकार या मागणीवर काय भूमिका घेणार, याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.