मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासाचा कणा मानली जाणारी लोकल रेल्वे आता आणखी विस्तारत आहे. सध्या मुंबई उपनगरी रेल्वेची एकूण लांबी सुमारे 390 किलोमीटर आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर असे तीन मुख्य मार्ग असून नेरुळ–बेलापूर ते उरण हा अतिरिक्त मार्ग आधीच सुरू आहे. या संपूर्ण जाळ्यावर दररोज अंदाजे 65 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.
लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक बाब म्हणजे उपनगरी रेल्वेचा विस्तार करणारे तब्बल १४ नवे प्रकल्प सध्या गतीने राबवले जात आहेत. या योजनांमध्ये मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान नवे ट्रॅक, पनवेल ते कर्जत उपनगरीय मार्ग, कल्याण ते बदलापूर आणि कसारा दिशेने अतिरिक्त लाईन, हार्बर मार्गाचा पश्चिम उपनगरांपर्यंत विस्तार, कुर्ला ते सीएसएमटी दरम्यान नवे ट्रॅक तसेच ऐरोली ते कळवा उड्डाणपूल मार्ग यांचा समावेश आहे.
या सर्व कामांमुळे लोकल रेल्वेचे जाळे सुमारे ४०० किलोमीटरपेक्षा जास्त वाढणार आहे. काही प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे, तर काहींसाठी पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढेल तसेच वेळेवर सेवा देणे अधिक सोपे होईल.
पनवेल, बदलापूर, कर्जत, उरण, विरार अशा परिसरात परवडणारी घरे मोठ्या प्रमाणात उभी राहत आहेत. त्यामुळे या भागांतून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून नव्या मार्गांवर भर दिला जात आहे.
पनवेल–कर्जत उपनगरीय मार्ग, ऐरोली–कळवा उंच मार्ग, कल्याण–बदलापूर आणि कल्याण–कसारा अतिरिक्त लाईन, बदलापूर–कर्जत तसेच आसनगाव–कसारा मार्गांचे विस्तार अशी अनेक कामे सुरू आहेत. यासाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे.
मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहावा ट्रॅक, गोरेगाव ते बोरिवली हार्बर मार्गाचा विस्तार, बोरिवली ते विरार आणि विरार ते डहाणू अतिरिक्त लाईन, तसेच नायगाव परिसरातील दुहेरी मार्ग या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. काही टप्प्यांची कामे २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
नव्या मार्गांमुळे लोकल आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांसाठी वेगवेगळे ट्रॅक उपलब्ध होतील. त्यामुळे गर्दी कमी होईल, प्रवासाचा वेळ वाचेल आणि गाड्यांची वेळापत्रक अधिक सुरळीत होईल. पनवेल ते कर्जत थेट लोकल सेवा सुरू होणार असून, ऐरोली–कळवा उड्डाणपूल मार्गामुळे ठाणे स्थानकावरील ताणही कमी होणार आहे.
एकूणच, या सर्व प्रकल्पांमुळे मुंबई उपनगरी रेल्वे अधिक मजबूत, वेगवान आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर होणार आहे.
थोडक्यात
मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासाचा कणा मानली जाणारी लोकल रेल्वे
लोकल रेल्वे नेटवर्कचा आता आणखी विस्तार
सध्या मुंबई उपनगरी रेल्वेची एकूण लांबी सुमारे 390 किमी