ताज्या बातम्या

Budget 2026 : रेल्वे की हायवे? निर्मला सीतारमणच्या बजेटमध्ये कोणाला मिळणार जास्त वाटा

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये पायाभूत सुविधांवरील (Infrastructure) खर्च वाढवण्यावर केंद्र सरकारचा विशेष भर असणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Published by : Varsha Bhasmare

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये पायाभूत सुविधांवरील (Infrastructure) खर्च वाढवण्यावर केंद्र सरकारचा विशेष भर असणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अर्थव्यवस्थेला चालना देणे, रोजगारनिर्मिती वाढवणे आणि ग्राहकांची खरेदी क्षमता मजबूत करणे, हा या धोरणामागचा मुख्य उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे आणि महामार्ग या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सरकारचा पैसा कोणाला अधिक मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टीआयच्या अहवालानुसार, पुढील आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेला अंदाजे 2.7 लाख कोटी रुपयांचे बजेट मिळण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात रेल्वेला 2.5 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. नवीन रेल्वे प्रकल्पांची संख्या वाढत असल्याने आणि मंजूर प्रकल्प वेगाने पुढे जात असल्यामुळे रेल्वेच्या बजेटमध्ये वाढ अपेक्षित आहे.

दरम्यान, महामार्ग क्षेत्रात तुलनेने मर्यादित वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही वर्षांत रस्ते बांधणीसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाल्यामुळे आता या क्षेत्रातील खर्च स्थिर पातळीवर राहू शकतो. सरकारच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत कॅपेक्स खर्चात 13 टक्क्यांची वाढ होऊन तो 6.7 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

रेल्वे विभागाने आतापर्यंत जवळपास 2 लाख कोटी रुपयांचा खर्च केला असून, तो वार्षिक बजेटच्या सुमारे 77 टक्के आहे. दुसरीकडे, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 1.8 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च केला असून, हा आकडा बजेटच्या सुमारे 68 टक्के आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, नवीन रेल्वे मार्ग, मल्टी-ट्रॅक प्रकल्प, ब्रॉडगेज नेटवर्कचे पूर्ण विद्युतीकरण आणि नवीन गाड्या, वॅगन व लोकोमोटिव्ह खरेदी यामुळे खर्च वाढणार आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात खर्चाचा वेग अधिक वाढतो, त्यामुळे रेल्वेसाठी जास्त तरतुदीची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

महामार्ग क्षेत्रात मात्र नवीन प्रकल्प मंजुरीचा वेग मंदावला आहे. 2026 पर्यंत 10,000 किमी महामार्गांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, मात्र आतापर्यंत फक्त 2,000 किमीचे प्रकल्प मंजूर झाले आहेत. याचा परिणाम आगामी बजेटमधील तरतुदींवर होऊ शकतो.

पायाभूत सुविधांवरील खर्च वाढवल्यास रोजगारनिर्मिती, उत्पन्नवाढ आणि गुंतवणूक वाढेल, असा सरकारचा विश्वास आहे. विशेषतः रेल्वे ही देशभरात स्वस्त, सुलभ आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचे साधन असल्याने Budget 2026 मध्ये रेल्वेला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता अधिक आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा