यंदा तब्बल 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक राज्यात काल पासूनच पावसाची संततधार सुरु आहे. मात्र सकाळपासुन मुंबईसह इतर उपनगरांमध्ये ही मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे नागरिकांची वेगळीच तारांबळ उडाली. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वे ही काही काळ ठप्प झाली होती. तर रस्त्यात पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीला लोकांना सामोरे जावे लागले. पहिल्याच पावसात मुंबई ची ही दशा झाल्याने ठिकठिकाणी मुंबई तुंबल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.
आज पहाटेपासुनच मुसळधार पाऊस असल्याने मुंबईतील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली. दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी मुंबईत प्रवास करत असतात. त्यातच पावसामुळे ठिकठिकणी पाणी साचले आणि वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. आज प्रभादेवी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्याचबरोबर केइ एम रुग्णालयामध्ये ही पाणी साचलं होत. परळ भागात तसेच सायन हिंदमाता वडाळा, गांधी मार्केट मध्ये ही ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे बेस्ट बसेस चे मार्ग वळवण्यात आले. केवळ रस्त्यावरच नाही तर या मुसळधार पावसाचा फटका तर रेल्वे ला ही बसला.
मस्जिद बंदर, माटुंगा रेल्वे स्थानकात पाणी साचल्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे काही काळ ठप्प होती तर भुयारी रेल्वे मार्गावरील आचार्य अत्रे चौक वरळी स्थानकात पाणीच पाणी साचलेले आज पाहायला मिळाले. तसेच पश्चिम मुंबई मध्ये ही हीच परिस्थिती पाहायला मिळाली. अंधेरी सबवे , सांताक्रूझ वाकोला परिसरात साचलेल्या पाण्यामुळे गाड्या पाण्याखाली गेल्या. मारिन ड्राइव्ह , कुलाबा, गोरेगाव , विलेपार्ले येथील सखल भागात ही काही प्रमाणात पाणी साचल्याने पाहायला मिळाले.
पहिल्याच पावसात मुंबई ठिकठिकाणी तुंबुन थांबल्यामुळे येत्या पावसात मुंबईतिल नागरिकांना वाहतूक कोंडी, आणि साचलेल्या पाण्याचा त्रास सहन करावा लागणार हे नक्की. मात्र यंदा कचऱ्यामुळे पावसाचे पाणी ठिकठिकाणी तुंबू नये किव्हा नाले सफाई न झाल्यामुळे पाणी साचू नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी ठिकठिकाणी आपली कामे चोख करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईमध्ये पाणी साचण्याचे प्रमाण कमी होईल अशी आशा आहे.