बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात परिवर्तित झाला असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) नऊ राज्यांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रालाही या वादळाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात मोठं नुकसान झालं असून, धोका अद्याप कायम असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे.
सध्या या वादळाचा वेग ताशी 63 किमी नोंदवला गेला आहे. पुढील तासांत हा वेग वाढून ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ आज मध्यरात्री ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. त्यानंतर पुढील तीन दिवसांत त्याची तीव्रता कमी होईल, मात्र पावसाचा जोर कायम राहील.
या वादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांत पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. सध्या ओडिशामध्ये पावसाने मोठं नुकसान केलं असून, जवळपास सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने इशारा दिला आहे.
महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत आज हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोकणात रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना, तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, नाशिक, कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.