गेल्या काही दिवसांपासून राज्याला पावसाने झोडपलं असून यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच आजपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने लावला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून महाराष्ट्रात आजपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे.
यावेळी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर 30 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच आयएमडीनुसार, 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान राज्यात गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यावर 28 आणि 29 रोजी पावसाचा जोर वाढेल.
लातूर, जालना आणि बीडमध्ये रेड, येलो अलर्ट जारी
हवामान खात्याने लातूर जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तर जालन्यात आज सकाळपासून रिप रिप पावसाने सुरुवात केली आहे. जालना जिल्ह्यातील परतुर, मंठा, घनसावंगी या तालुक्यात आज सकाळपासून रिप रिप पाऊस बरसतो आहे. जालना जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, आज सकाळ पासून पाऊस सुरू आहेत. दरम्यान जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
तर दुसरीकडे बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बिंदूसरा नदीला महापूर आला आहे. ज्यामुळे बीड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडल्यामुळे लाखो लिटर पाण्याचा विसर्ग माजलगाव धरणात गेले आहे. तर मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत, ज्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.