ताज्या बातम्या

MVA-MNS Delegation : पत्रकार परिषदेत राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे जयंत पाटीलांचे मुद्देसूद प्रश्न; आयोगाला काय शिक्षा करायची? नेमकं काय म्हणाले; जाणून घ्या....

राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच राज्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटले असून महाविकास आघाडीने निवडणूक आयोगावर थेट पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.

Published by : Prachi Nate

राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच राज्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटले असून महाविकास आघाडीने निवडणूक आयोगावर थेट पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. मुंबईत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (जयंत पाटील गट), काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते एकत्र आले होते. त्यांनी मतदार याद्यांतील विसंगती, मतदारांची हटवलेली नावे, एका घरात असलेले शेकडो मतदार, आणि भाजपशी संबंधित असलेल्या कंपन्यांना दिलेले कंत्राट यावरून निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली.

जयंत पाटील : “813 मतदार एका घरात? आणि ते घर अस्तित्वातच नाही!”

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत मतदार यादीतील गंभीर त्रुटींचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की नाशिकच्या मध्य मतदारसंघात 3829 या घर क्रमांकात 813 मतदार दाखवले गेले आहेत, तर बडनेऱ्यात 'घर क्रमांक 0' दाखवून शून्य मतदार असूनही ते नाव यादीत आहेत. शिरूर मतदारसंघातील केसनन गावात, अशोक पवार यांनी एकाच घरात 188 मतदार दाखवले गेले असून, तिथे ते घर अस्तित्वातच नसल्याची लेखी तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. परंतु त्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी ‘प्रायव्हसी’चे कारण देत माहिती देण्यास नकार दिला. जयंत पाटील म्हणाले, “मतदान गोपनीय असते, मतदार नाही. आम्ही निवडणूक आयोगाला कायद्यानुसार (कलम 32 अंतर्गत) निवडणुकीसाठी वापरलेली माहिती मागितली होती. हे खाजगी माहिती नाही. तरीही त्यांनी माहिती नाकारली.”

राज ठाकरे : “मतदान गोपनीय असतं, मतदार नाही!”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर थेट सवाल करत म्हटलं, “निवडणूक आयोग म्हणतो मतदारांची यादी गोपनीय आहे, पण मला वाटतं की मतदान गोपनीय असतं, मतदार नाही! 2022 मध्ये फोटोसह यादी उपलब्ध होती, आता फोटो हटवलेत – हे पारदर्शकतेचं लक्षण कसं?” राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित करत निवडणूक आयोगानेच निवडणुकीबाबत पारदर्शकतेच्या तत्वांना फाटा दिल्याचा आरोप केला. त्यांनी देवांग दवे या भाजपशी संबंधित असलेल्या व्यक्तीला निवडणूक यंत्रणेच्या कामात सहभागी करून घेण्यावरूनही नाराजी व्यक्त केली. “वेबसाईट हाताळण्याचं कामच भाजपच्या संबंधित कंपनीला दिलंय. मतदार यादीत हेरफेर याचमुळे होतोय, असा आमचा समज आहे,” असं राज ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे : “मतचोरी हीच सत्ता प्राप्तीची चोरवाट”

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे संपूर्ण प्रकरण लोकशाहीसाठी गंभीर धोका असल्याचं सांगितलं. त्यांनी सांगितलं की, विधानसभा निवडणुकीच्या एक महिना आधी म्हणजेच 19 ऑक्टोबर 2024 रोजी महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं. यात मतदार याद्यांमध्ये पक्षपाती हेरफेर होत असल्याचं स्पष्ट म्हटलं होतं. “कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जात होत्या हिरव्या पेनाने टिक करा ते ठेवायचे, लाल पेनाने टिक केलेली नावे काढायची! निवडणूक आयोगाने याकडे लक्ष दिलं नाही. मग याला निवडणूक म्हणायचं की सिलेक्शन?” असा सवाल त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर टीका करताना म्हटलं की, “आम्ही कठपुतळ्यांशी बोलतोय का? कारण निर्णय कुठेतरी वर घेतले जातात. दोन्ही आयुक्तांना भेटलो, त्यांनी फक्त ‘विचार करू’ असं सांगितलं. पण विचार करून काही होत नाही, कारवाई हवी.”

बाळासाहेब थोरात : “20 हजार बाहेरचे मतदार मतदान करतात, ही लोकशाही नाही”

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा निवडणुकीत 20,000 बाहेरून आणलेले मतदार मतदान करत असल्याचं सांगितलं. “कॉलेज हॉस्टेलमध्ये राहणारे, बाहेरून आलेले विद्यार्थी देखील मतदार यादीत सामील आहेत. यावर आम्ही वेळेवर निवडणूक आयोगाला माहिती दिली होती, पण कोणतीही कारवाई झाली नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं. “मतदार यादी 1 जुलैला राज्य निवडणूक आयोगाकडे दिली गेली, पण त्याआधी कोणतंही पुनर्विलोकन किंवा दुरुस्ती झाली नाही. ही यादी दोषयुक्त असूनही निवडणूक घेणं म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे,” असा आरोप थोरात यांनी केला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा