ताज्या बातम्या

Raj Thackeray : मराठी महिला खासदारांची संसदेत आक्रमक भूमिका, राज ठाकरेंकडून अभिनंदन

मराठी अस्मितेसाठी संसदेत ठाम भूमिका, राज ठाकरेंकडून अभिनंदन

Published by : Team Lokshahi

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या मराठीविरोधी विधानावर काँग्रेसच्या महिला खासदारांनी संसद परिसरात आक्रमक भूमिका घेतली. मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड, चंद्रपूरच्या प्रतिभा धानोरकर आणि धुळ्याच्या शोभा बच्छाव यांनी दुबेंना थेट जाब विचारला. या धाडसी कृतीचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कौतुक केलं आहे.

राज ठाकरे वर्षा गायकवाडांना लिहलेल्या पत्रात लिहतात -

प्रति,खासदार वर्षाताई गायकवाड, सस्नेह जय महाराष्ट्र!

मराठी माणसांना आपटून आपटून मारू, अशी दर्पोक्ती करणाऱ्या निशिकांत दुबेला तुम्ही संसदेत घेराव घातलात आणि त्याला जाब विचारलात याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा अपमान, त्यावर हल्ली सर्रास अन्याय होत असताना, संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे खासदार गप्प असतात असं चित्र मराठी जनांच्या समोर येत होतं, त्याला तुम्ही या कृतीने छेद दिलात. याबद्दल बरंच मनापासून आभार.

महाराष्ट्राला सध्या 'व्यापक भूमिका घेण्याच्या विचारांनी ग्रासलेलं आहे. माझ्या मते हा उभाच ओढवून घेतलेला न्यूनगंड आहे. महाराष्ट्राने देशाचा विचार केला पाहिजे हे खरे आहे कारण देशाचा विचार करावा आणि देशासाठी काही करावं अशी क्षमता असलेली जी काही मोजकी राज्य आहेत त्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. पण म्हणून आपण मराठी आहोत, मराठी जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे, त्यामुळे या जनतेप्रती, या प्रांताबद्दल आपली जबाबदारी पहिली आहे याचा विसर पडायला लागला आहे.

यामुळेच सव्वाशे वर्ष हिंद प्रांतावर राज्य करणाऱ्या, आणि 1857 चा उठाव असू दे की पुढचा स्वातंत्र्यलढ्याला आकार देणाऱ्यात मरहट्टे होते याचा आपल्याला विसर पडतो आणि म्हणूनच या उत्तरेतील मुजोरांना दिल्लीत सातत्याने महाराष्ट्र आणि मराठी माणसाची ताकद दाखवलीच पाहिजे, आणि तुम्ही ती दाखवलीत याबद्दल मनापासून आभार.

महाराष्ट्रातील इतर 45 खासदार गप्प का बसले माहित नाही, पण तुम्ही हिंमत दाखवलीत याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्रासाठी तुमचा संसदेतील आवाज असाच बुलंद राहील अशी आशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणूस या समोर कोणतेही आपले वैचारिक मतभेद अत्यंत क्षुद्र आहेत ! तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! आपला नम्र, राज ठाकरे

मराठी महिलांनी संसदेत मराठी अस्मितेसाठी उभं राहून ठामपणे आपली भूमिका मांडली, याची दखल आता राजकारणाच्या विविध पातळ्यांवर घेतली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा