मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सेनेचे नेते अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हिंगोली औंढा नागनाथ रोडवरील लिंबाळा मक्ता भागात हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये 25 वर्षांच्या अजिंक्य घुगेचा मृत्यू झाला आहे. मनसे जिल्हाध्यक्ष बंडू कुठे यांचा भाचा होता. या अपघातामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मंगळवार 11 मार्च रोजी 9 वाजताच्या सुमारास हिंगोली औंढा नागनाथ रोडवरील पिंपरी लिंबाळा मक्ता परिसरात मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष हे आपल्या कारमधून औंढा नागनाथ येथून हिंगोलीकडे येत होते. यावेळी त्यांची कार आणि पिकअप वाहनाचा अपघात झाला. अपघातादरम्यान वाहनाच्या धडकेचा आवाज झाल्याने परिसरातील संतुक पिंपरी लिंबाळा येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे. ग्रामीण पोलिस स्थानकाचे श्याम कुमार डोंगरे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर घटनेचा पंचनामादेखील केला. अजिंक्य घुगेबरोबर दिनेश पोले आणि निखिल पराडकर हे होते. यामध्ये दोघंही जखमी झाले आहेत.