संपूर्ण राज्यालाच नाही, तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता होती, तो ठाकरे बंधूंचा मेळावा आज मुंबईतील वरळी येथील डोम सभागृहात राज-उद्धव विजयी मेळावा पार पडला. ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळत, शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. 20 वर्षांनंतर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एका मंचावर पाहायला मिळाले. यादरम्यान मराठी भाषेच्या विरोधात जाणाऱ्यांवर राज ठाकरेंची तोफ कडाडलेली पाहायला मिळाली. यादरम्यान राज ठाकरेंनी काही महत्त्वाचे मुद्दे या भाषणात मांडले आहेत, ते जाणून घ्या.
"माझ्या मुलाखतीत म्हटलं होत, कोणत्या वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तब्बल २० वर्षानंतर मी आणि उद्धव एकाच व्यासपीठावर आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही ते काम देवेंद्र फडणवीसला जमलंय. आपल्याकडे मूळ विषय सुरू बाजूला सोडून इतर गोष्टी सुरू होतात". असं म्हणत राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.
"माझ्या महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेनं पाहायचं नाही, हा प्रश्न गरजेचा नव्हता. कशासाठी हिंदी, कोणासाठी हिंदी, लहान मुलांवर जबरदस्ती लादत आहेत. तुमच्या हातात सत्ता असेल, ती विधान भवनात. आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर, असे राज ठाकरेंनी फडणवीस सरकारला ठणकारवलं". असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.
"आज सगळे मराठी म्हणून एकत्र आले आहेत. सत्ताधाऱ्यांच पुढचं राजकारण उद्या तुम्हाला जातीमध्ये अडकवणार. ते जातीच कार्ड खेळणार. तुम्हाला एकत्र येऊ देणार नाही. जातीपातीच राजकारण करणार."
"1999 सालचा प्रसंग मी कधीही विसरणार नाही. प्रकाश जावडेकर, मीनलताई बाळासाहेबांना भेटायला आले. मुख्यमंत्रीपदाचा विषय सुरू होता. सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री करायचं हा त्यांचा निरोप घेऊन मी बाळासाहेबांकडे गेलो. ते म्हणाले त्यांना जाऊन सांग, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल, दुसरा कोणी होणार नाही. त्यावेळी बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेला हाथ मारली. हे संस्कार ज्या पोरावर झाले, तो मराठीशी तडजोड करणार नाही. त्यामुळे या पुढेही तुम्ही सर्वांनी सावध आणि सतर्क राहणं गरजेच आहे. ही मराठीसाठीची एकजूट कायम राहावी. बाळासाहेबांच स्वप्न पुन्हा साकारावं,"
"आमची मुले इंग्रजीमध्ये शिकली, माझे वडील माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे इंग्रजीत शिकले मात्र त्यांच्या मराठी भाषेच्या प्रेमावर तुम्ही शंका घेणार का? लालकृष्ण अडवाणी मिशनरी शाळेत शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्न घेणार का? बाळासाहेब ठाकरे इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्रे काढत होते, मात्र त्यांनी कधी मराठीच्या अभिमानाबाबत तडजोड नाही केली".