मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील स्नानावर भाष्य करताना म्हटले आहे की, "एक बैठक लावली होती मुंबईला. त्या बैठकीला शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष हजर झाले नाहीत. मग हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली. प्रत्येकाला कारण विचारलं. त्यातील पाच सहा जणांनी कुंभला गेला होतो सांगितलं. त्यांना म्हटलं मग गधड्यांनो पापं कशाला करता. आल्यावर आंघोळ केलीस का हेदेखील विचारलं. आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून पाणी घेऊन आले. मी म्हटलं हड मी नाही पिणार. मी त्या सोशल मीडियावर व्हिडीओ पाहतोय तिथे आलेल्या बाया, पुरुष अंग घासतायत आणि बाळा नांदगावकर म्हणतात साहेब हे गंगेचं पाणी घ्या, कोण पिणार ते पाणी? 2 वर्ष तोंडाला फडके बांधून फिरले आणि तिकडे जाऊन अंघोळ करत आहेत. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही? या देशामधली एक नदी स्वच्छ नाही. आम्ही काय नदीला माता म्हणतो. परदेशात जातो तेव्हा स्वच्छ नद्या पाहतो. ते काय तिथे माता म्हणत नाहीत, तरी नदी स्वच्छ असते."
"राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार हे ऐकत आहे. राज कपूर यांनी चित्रपट काढला, लोकांना वाटलं गंगा साफ झाली. पण त्यात वेगळी गंगा होती. लोक म्हणाले, अशी गंगा साफ असेल तर आम्हीही आंघोळ करायला तयार आहोत. पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा. आपली डोकी नीट हलवा" असे राज ठाकरे म्हणाले.
यावर प्रतिक्रिया देत सुषमा अंधारे म्हणाल्या की, अधूनमधून राज ठाकरे खरं बोलतात. कुंभमेळ्याच्या संदर्भाने देशातील नद्यांचे पाणी आणि स्वच्छता प्रकल्पाबद्दल त्यांनी मांडलेली भूमिका दुर्दैवाने खरी आहे. ती प्रबोधनकारांच्या डोळस हिंदुत्वाशी सुसंगत आहे. तेव्हा त्याचा विपर्यास करण्यापेक्षा मोदी भक्तांनी आत्मचिंतन करावे.