Raj Thackeray on Adani : मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या जाहीर सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून अदानी समूहाच्या वाढीवर प्रश्न उपस्थित केले. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रासह देशभरात अदानींना मोठे प्रकल्प आणि महत्त्वाच्या जागा कशा मिळाल्या, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. त्यांच्या या सादरीकरणामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली.
राज ठाकरेंच्या आरोपांनंतर भाजपकडून तात्काळ प्रतिक्रिया देण्यात आली. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करत, पूर्वी झालेल्या अदानी–राज ठाकरे भेटीचा उल्लेख केला. त्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी राज ठाकरे यांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला.
सभेत बोलताना राज ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास, मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ तसेच इतर मोठ्या प्रकल्पांवरही शंका व्यक्त केली. आपण उद्योगपतींच्या विरोधात नाही, पण एका व्यक्तीला असामान्य पद्धतीने फायदा दिला जात असेल तर त्यावर प्रश्न विचारणं गरजेचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.