हिंदी भाषेची सक्ती विरोधात 5 जुलै रोजी महामुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चात राज्याचे दोन प्रमुख नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे – एकत्र येणार आहेत. या ऐतिहासिक एकत्रिकरणामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, आरोप-प्रत्यारोपांचे रणशिंग फुंकले गेले आहे. तथापि, या मोर्चाचे खरे स्वरूप आणि परिणाम ‘५ जुलैला दिसणार पिक्चर’ म्हणून सध्या चर्चेत आहे.
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे नियोजन सुरू झाले असून, त्याच दिवशी हा निर्णय घेतल्यानंतर लागलीच तयारी सुरू करण्यात आली. परवानग्या, पोलिस प्रशासनाशी समन्वय, नियोजन आणि अंमलबजावणी यामध्ये मनसेचे पदाधिकारी सातत्याने कार्यरत आहेत. “ही आमची जबाबदारी आणि भाषिक अस्मितेचा लढा आहे,” अशी भूमिका शिलेदारांनी मांडली आहे.
या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने हिंदी सक्तीला पाठिंबा दिला असून, ती विद्यार्थ्यांच्या हितासाठी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, हा दावा फेटाळून लावत मनसेने विरोधाची भूमिका अधिक बळकट केली आहे. “सरकारने स्वतःच्या मनाशी एकदा विचार करायला हवा – खरंच ही सक्ती आवश्यक आहे का?” असा सवाल करत जनमत हे हिंदी सक्तीच्या विरोधात असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झाला का, यावर मनसे पदाधिकारी म्हणाले, “त्याची काही कल्पना नाही.” मात्र, दोन विचारसरणींच्या नेत्यांचा एकत्र येणं, हे मराठी भाषिक समाजासाठी निश्चितच निर्णायक क्षण आहे.
“राजकीय मतभेद बाजूला ठेवून, जो कोणी मराठी भाषेच्या प्रेमातून, सक्तीविरोधात या मुद्द्याशी एकमताने उभा राहणार असेल, त्या सर्वांचे या मोर्चात स्वागत आहे,” असं राजसाहेबांनी स्पष्ट केलं आहे. कोणताही पक्षीय झेंडा नसलेला, हा मोर्चा फक्त मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि हक्काचा असेल, असंही त्यांनी नमूद केलं.
तिसऱ्या भाषेची सक्ती ही अनावश्यक असून, ती नकोच — ही मनसेची ठाम भूमिका आहे. राज ठाकरे यांचं स्पष्ट मत आहे की, भाषेच्या मुद्द्यावरून दिशाभूल करणं योग्य नाही. 5 जुलैचा हा मोर्चा केवळ रस्त्यावरचा जनआक्रोश नसून, तो राज्याच्या भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेच्या रक्षणासाठीचा निर्णायक टप्पा ठरणार आहे.