थोडक्यात
शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष अधिकच तीव्र होत आहे.
या राजकीय वादाला वैयक्तिक स्वरूप येऊ लागले आहे.
अनिल परबांच्या त्या वक्तव्यावर रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांनी भावनिक खुलासा केला.
शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष अधिकच तीव्र होत असताना आता या राजकीय वादाला वैयक्तिक स्वरूप येऊ लागले आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शनिवारी (४ ऑक्टोबर) केलेल्या गंभीर आरोपांनंतर माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांनी आज (रविवार) पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन स्पष्ट आणि भावनिक खुलासा केला.
परब यांनी आरोप केला होता की, १९९३ साली ज्योती कदम यांनी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या घटनेची सखोल चौकशी व्हावी, तसेच रामदास कदम यांची नार्को टेस्ट घ्यावी. या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
या आरोपांना प्रत्युत्तर देतानाJyoti Kadam म्हणाल्या, “हे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. त्या काळात आमच्याकडे गॅस सिलेंडर नव्हता. मी स्टोव्हवर स्वयंपाक करत होते. अचानक माझा पदर स्टोव्हला लागून पेटला आणि माझ्या अंगाला आग लागली. माझे पती रामदास कदम यांनीच मला वाचवले. त्यांचे हात भाजले होते. त्यांनीच मला तात्काळ रुग्णालयात नेले आणि नंतर परदेशात उपचारासाठी नेले. त्या काळात त्यांनी खूप त्रास सहन केला. मला वाचवण्यासाठी त्यांनी धडपड केली. आता त्या घटनेवरून आम्हाला बदनाम करणं चुकीचं आहे,” असं त्यांनी सांगितलं.
त्या पुढे म्हणाल्या, “हे आरोप आमच्यासाठी मानसिक वेदना देणारे आहेत. आम्ही साधं जीवन जगत होतो. त्या काळात अशा अफवा पसरवण्यात आल्या, पण आम्ही शांत राहिलो. मात्र आता पुन्हा हे प्रकरण उकरून राजकारण केलं जात आहे. मला माध्यमांसमोर यायचं नव्हतं, पण खोट्या गोष्टी ऐकून आता राहवलं नाही.”
या आरोपांवर रामदास कदम यांनीही प्रतिक्रिया दिली. “खेड येथील आमच्या घरात दोन स्टोव्ह होते. स्वयंपाक करताना पत्नीच्या साडीला आग लागली होती. मी तिला वाचवलं आणि माझे हात भाजले. पुढे सहा महिने ती जसलोक रुग्णालयात उपचार घेत होती. त्या काळात खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी तिच्या प्रकृतीची चौकशी केली होती,” असं कदम म्हणाले.
राजकारणात विचारांचा संघर्ष असावा, पण आता तो वैयक्तिक आयुष्याच्या पातळीवर पोहोचल्याचं दिसत आहे. अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटातील तणाव पुन्हा उफाळून आला आहे.
ज्योती कदम यांनी शेवटी भावनिक आवाहन केलं “राजकारण असू द्या, पण आमचं आयुष्य त्यात ओढू नका. आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न थांबवा. माझ्या घरात घडलेली ती घटना अपघात होती, गुन्हा नव्हे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे जुन्या घटनेवरून निर्माण झालेला वाद आता नव्या चर्चेला तोंड फोडणार आहे. राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक जीवनात घुसणारा हा वाद अनेकांना अस्वस्थ करणारा ठरला आहे.