१३ जानेवारीपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू झाला. पण, २९ जानेवारीला पहाटे १.३० वाजता गालबोट लावणारी घटना घडली. मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी भाविक संगमाकडे जात असताना चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला आहे तर ९० जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेवर योगगुरु बाबा रामदेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार आणि प्रशासनाचं काम चोख होतं पण लोकांनाच शिस्त नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
घटनेवर बाबा रामदेव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ही घटना खुपच दुःखद आहे. करोडो लोक इथं येणार असल्यानं इतकी मोठी व्यवस्था इथं करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या गर्दीमध्ये एकाही व्यक्तीकडून चूक झाली तर अशा घटना घडतात. त्यामुळं मी तर सर्वांना आवाहन करेन की शासन प्रशासन तर आपली जबाबदारी निभावतंय पण जो कोणी कुंभमेळ्यात जाईल त्यानं स्वयंशिस्त देखील पाळली पाहिजे. धर्माचं पहिलं लक्षणंच आहे की संयम पाळणं. संयम सोडू नका, तसंच ज्यांना संगमापर्यंत जाण्याची संधी मिळेल त्यांनी तिथं जावं पण संगमाच्या केवळ स्पर्शानंच सगळीकडं पवित्र अमृत जल प्रवाहित होत असतं. तिथं केवळ जाण्यानंच सर्वांचं अमृत स्नान होऊ जातं.
"कुंभमेळ्याचं जे फळ आहे ते दृश्यतेपेक्षा अदृश्य आणि अमुर्त आहे म्हणजेच ते केवळ अनुभवनं आहे. अशा प्रकारे अमृत पर्वात एकात्म होण्याची संधी शंभर वर्षांनंतर येते, त्यामुळं या गोष्टींचं जर आपण लक्ष दिलं तर अशा घटना आपण टाळू शकतो. तीर्थ क्षेत्रांवर जे दिवंगत होतात ते देवालाच शरण गेलेले असतात," असंही बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.