राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात खंडणी प्रकरण उफाळले असून, या प्रकरणाशी संबंधित तपासात माजी विधान परिषद सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकरांना वडूज पोलिसांनी समन्स बजावला आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदर प्रकरणामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, सातारा जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घार्गे यांनाही वडूज पोलिसांकडून समजपत्र पाठवण्यात आले आहे. शुक्रवारी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यापूर्वी या प्रकरणात पत्रकार तुषार खरात, संबंधित महिला आणि शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून एका कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप आहे. अटकेनंतर तिघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांचा तपास वडूज पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील चौकशीसाठी पुण्यातील माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या घरीही पोलिसांनी भेट दिली आहे. या सगळ्या घडामोडींमुळे प्रकरणाला नवे राजकीय वळण लागले असून आणखी काही मोठ्या नावांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.