बुलढाण्यात अतिशय दुर्मिळ अशी वैद्यकीय बाब समोर आली आहे. आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात बाळ अशी स्थिती समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. वैद्यकीय भाषेत या स्थितीला 'फेटस इन फेटू' असं म्हटलं जातं. सर्वात दुर्मिळ अशी ही घटना आहे. अशा मोजक्याच केसेस असतात. बुलढाण्यात ही घटना समोर आली आहे.
दोन दिवसांपूर्वी एक महिला प्रसुतीसाठी स्त्री रुग्णालयात दाखल झाली. त्यावेळी तिची सोनोग्राफी केली असता तिच्या पोटात जुळं असल्याचं सोनोग्राफीमध्ये दिसल्याचं डॉक्टर सांगतात. मात्र व्यवस्थित परिक्षण केलं असता बाळाच्या पोटात बाळ असल्याचं लक्षात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. महिलेची प्रकृती उत्तम असून तिला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये हलवण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
'फेटस इन फेटु' म्हणजे काय?
'फेटस इन फेटु' (fetus in fetu) हे एक वैद्यकीय स्थिती आहे. ज्यामध्ये एका भ्रूणाच्या आत दुसऱ्या एका भ्रूणाचा (किंवा त्याच्या अवयवांचा) अंश असतो. या स्थितीला 'फेटस इन फेटु' म्हणून ओळखलं जातं, आणि ही स्थिती खूप दुर्मिळ असते.
साधारणतः हा प्रकार म्हणजे एका भ्रूणाचा वाढलेला अंश दुसऱ्या भ्रूणाच्या शरीरात विकसित होतो. याचा परिणाम म्हणजे त्या शरीरात एक अविकसित भ्रूण असू शकतो, जो मुख्य भ्रूणाच्या शरीरात आढळतो. अशा भ्रूणाच्या स्थितीनुसार शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो.
काय म्हणाले डॉक्टर?
सोनोग्राफी करताना असं लक्षात आलं की आईच्या पोटात बाळ आहे आणि बाळाच्या पोटात बाळ आहे. ही अतिशय दुर्मिळ घटना असते. अशा वैद्यकीय परिस्थितीच्या जगात १००-२०० केसेसपेक्षा जास्त केसेस आढळून आलेल्या नाहीत. भारतामध्ये अशा १०-१५ केसेसची नोंद करण्यात आली आहे. आधीच्या सोनोग्राफीमध्ये हे लक्षात आलं नसल्याचं वक्तव्य बुलढाण्यातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी म्हटलं आहे.
सविस्तर बातमी पाहण्याासाठी क्लिक करा-