थोडक्यात
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
पुन्हा मंत्रिपद मिळणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊतांनी या विषयावर मोठा गौप्यस्फोट केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊतांनी या विषयावर मोठा गौप्यस्फोट केला आहे.
संजय राऊत म्हणाले, “धनंजय मुंडेंना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यामागे दिल्लीचा आदेश आहे. अमित शाह यांच्या आदेशामुळेच त्यांना बाजूला करण्यात आले. यात अजित पवारांची काही भूमिका नाही. महाराष्ट्रातील अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांचे मूळ निर्णयकर्ते दिल्लीतील अमित शाह आहेत. त्यामुळे मुंडेंचं काय होणार, हेही दिल्ली ठरवते.”
दरम्यान, रायगडमधील खासदार सुनील तटकरे यांच्या सत्कार सोहळ्यात धनंजय मुंडे भावूक झाले होते. “मी आज जे काही आहे, ते सुनील तटकरे यांच्यामुळे आहे. माझ्या हाताला काहीतरी काम द्या. आम्ही चुकलो तर कान धरा, पण आता आम्हाला रिकामं ठेवू नका. आम्हाला जबाबदारी द्या,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मुंडेंच्या या विधानानंतर त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे आता या चर्चेला नवे वळण मिळाले आहे.