पुण्यातल्या कसबा पेठ मतदारसंघातील माजी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर उद्या (शुक्रवारी) शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. धंगेकर यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांच्यात शिवसेना पक्ष प्रवेशावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उदय सामंत यांच्या शासकीय निवासस्थान शिंदेंची भेट घेतली असून दोघांमध्ये पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
कसबा पेठ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. २८ वर्षांपासून कसबापेठेत भाजपाचे वर्चस्व होतं. १९९५ पासून २०१९ पर्यंत गिरीश बापट हे आमदार होते. त्यांच्यानंतर २०१९ मध्ये मुक्ता टिळक या मतदारसंघातून निवडून आल्या. मात्र, २०२३ मध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर विजयी झाले. त्यानंतर राजकीय वर्तुळात धंगेकरांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली.
धंगेकर यांचा राजकीय प्रवास
रवींद्र धंगेकर यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे काँग्रेसला सुरूंग लागणार आहे. त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत रोचक आहे. शिवसेना-मनसे-काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. आता पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने एक वर्तुळ पूर्ण होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे आणि मतदारसंघातील ओबीसी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.
सुरुवातीला शिवसेनेत 10 वर्षे काम केले. त्यानंतर ते राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सामील झाले. 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले धंगेकर यांची मतदारसंघातील तळागाळात पकड मजबूत असल्याचं म्हटलं जातं. धंगेकर यांनी 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी, भाजपचे तत्कालीन उमेदवार गिरीश बापट यांना त्यांनी कडवी लढत दिली होती. तसेच 2014 मध्ये त्यांना कसबा पेठेतील विधानसभा निवडणुकीत सुद्धा पराभव पत्करावा लागला.
2017 मध्ये, तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, 2019 मध्ये काँग्रेसने धंगेकर यांना तिकीट न देत अरविंद शिंदे यांना उमेदवारी दिली होती.
दरम्यान, रवींद्र धंगेकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेला आपली ताकद वाढवण्यासाठी धंगेकर यांचा अनुभव आणि नेतृत्व लाभ होईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर शिवसेनेला काँग्रेसचे माजी नेते आणि कार्यकर्ते मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेचं ऑपरेशन टायगर कितपत यशस्वी ठरते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-