ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता शेतीसाठी किंवा लघु उद्योगांसाठी (MSME) कर्ज घेणाऱ्या नागरिकांना सोने आणि चांदी गहाण ठेवून 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येणार आहे. विशेष म्हणजे, या कर्जासाठी व्यक्तीने स्वेच्छेने जर सोने किंवा चांदी तारण ठेवण्याची तयारी दाखवली, तर बँकेला ते नाकारता येणार नाही.
या निर्णयामुळे विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी व सूक्ष्म उद्योजक यांना आर्थिक मदत सहज मिळू शकणार आहे. कारण सोने ही संपत्ती अनेक कुटुंबांमध्ये सहज उपलब्ध असते आणि त्याचा वापर आता शेतीसाठी किंवा उद्योग उभारणीसाठी होऊ शकतो.
11 जुलै रोजी RBI ने परिपत्रक जारी करत या निर्णयाची घोषणा केली. बँक अधिकाऱ्यांच्या मते, यामुळे शेतीसाठी किंवा उद्योजकतेसाठी तात्काळ कर्जाची गरज असणाऱ्यांना मदतीचा मोठा हात मिळणार आहे. यामुळे बँकांना देखील गहाण ठेवलेल्या मूल्याच्या आधारे सुरक्षित कर्ज देणे शक्य होणार आहे.
2023 मध्ये RBI ने सुवर्ण कर्ज संबंधित मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट करत दागिन्यांवर दिले जाणारे कर्ज 'गोल्ड लोन' म्हणून वर्गीकृत करण्यास सांगितले होते. मात्र त्यावेळी कर्जावर सवलत देण्याबाबत मर्यादा होत्या. नवीन धोरणानुसार, शेतकरी आणि लघुउद्योजकांना अधिक लवचिकता मिळणार आहे.
या निर्णयामुळे बँकांना कमी जोखीमेत कर्ज वाटप करता येणार असून, ग्रामीण भागात आर्थिक सशक्तीकरणाच्या दिशेने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सरकारच्या आर्थिक समावेशन धोरणाला यामुळे गती मिळणार आहे.