दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर काल दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. रेखा गुप्ता यांच्या नावाची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी म्हणून घोषणा करण्यात आली. तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आली आहे.
भाजपच्या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. रेखा गुप्ता यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून दिल्लीत रामलीला मैदानात आज शपथविधीचा सोहळा पार पडला. यासोबतच परवेश वर्मा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. यासोबतच मनजिंदर सिंग सिरसा (राजौरी गार्डन), रविंद्र कुमार इंद्रज (बवाना), कपिल मिश्रा (करवाल नगर), आशिष सूद (जनकपुरी) आणि पंकज कुमार सिंग (विकासपुरी) या आमदारांनी देखील शपथ घेतली.