देशातील प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने एफएमसीजी क्षेत्रात जोरदार प्रवेश केला आहे. कंपनीच्या रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (आरसीपीएल) ने ७५ वर्ष जुना फूड ब्रँड SIL एका नव्या अवतारात पुन्हा लाँच केला आहे. कॅम्पा कोला नंतर, आता अंबानींची कंपनी नूडल्सपासून केचप, जॅमपर्यंत सर्व काही परवडणाऱ्या किमतीत विकणार आहे.
नवीन उत्पादने आणि किंमती
रिलायन्स इंडस्ट्रीजने मंगळवारी जाहीर केले की, SIL नूडल्सची नवीन श्रेणी बाजारात येत आहे. या नूडल्सची चार प्रकारांमध्ये उपलब्धता असेल:
मसाला नूडल्स
आटा विथ व्हेजिज नूडल्स
कोरियन के-फायर नूडल्स
चाऊ-चाऊ नूडल्स
किंमत फक्त ५ रुपयांपासून सुरू होईल. तसेच SIL टोमॅटो केचप ही खऱ्या टोमॅटोपासून आणि कृत्रिम घटकांशिवाय तयार केली जाईल. या केचपची किंमत १ रुपयांपासून सुरू होईल.
ब्रँडचा इतिहास
SIL ची सुरुवात जेम्स स्मिथ अँड कंपनी म्हणून झाली. नंतर १९९३ मध्ये मॅरिको इंडस्ट्रीजने हा ब्रँड विकत घेतला. त्यानंतर मॅरिकोने डॅनिश कंपनी गुड फूड ग्रुपच्या स्कँडिक फूड इंडियाला ब्रँड विकला. २०२१ मध्ये फूडसर्व्हिस इंडिया ने हा ब्रँड घेतला आणि जानेवारी २०२५ मध्ये रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स ने फूडसर्व्हिस इंडियाकडून SIL ब्रँड खरेदी केला.
अलीकडेच रिलायन्सने एफएमसीजी विभागात वेगाने विस्तार केला आहे, ज्यामध्ये कॅम्पा कोला सॉफ्ट ड्रिंक्स, रस्क्विक बेव्हरेजेस, सोस्यो कार्बोनेटेड ड्रिंक्स, लोटस चॉकलेट्स आणि रावलगाव अँड टॉफीमन कन्फेक्शनरी यांचा समावेश आहे.
याशिवाय, आठ फळांपासून बनलेला SIL मिक्स्ड फ्रूट जॅम देखील लाँच केला जात आहे, ज्याची सुरुवातीची किंमत २२ रुपये आहे.