थोडक्यात
SIM Scam ओळखण्याची ही आहे सोपी पद्धत
तुमच्याही बँक अकाऊंटमधून अचानक पैसे काढले गेले?
डिजीटल स्कॅमपासून सावध राहण्यासाठी खास टिप्स लक्षात ठेवा
डिजिटल जगात सायबर गुन्हेगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी नवीन पद्धती शोधत आहेत. आतापर्यंत ऑनलाइन शॉपिंग स्कॅम, नोकरी स्कॅम, कर्ज स्कॅम, ओटीपी स्कॅम, गुंतवणूक स्कॅम याबाबत तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. या स्कॅमच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो लोकांकडून करोडो रुपये उकळण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या या स्कॅमबाबत लोकं सावध झाली आहेत.
सिम स्वॅप स्कॅम
स्कॅमर्सने सध्या लोकांची फसवणूक करण्यासाठी सिम स्वॅप हा नवीन स्कॅम शोधला आहे. या स्कॅमच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या स्कॅममध्ये स्कॅमर्स तुमच्या मोबाईल नंबरवर पूर्णपणे नियंत्रण मिळवतात. विचार करा, की तुम्ही सकाळी उठलात आणि तुमच्या फोनमध्ये एकही कॉल आला नाही, मेसेज नाही, फोनचे नेटवर्क अचानक गायब झाले… त्यानंतर तुम्हाला एक मेल आला की तुमच्या बँक अकाऊंटमधून सर्व पैसे काढण्यात आले आहेत… तर? तुमच्यासोबत अशी घटना घडली तर समजून जा की तुम्ही सिम स्वॅप स्कॅमला बळी पडला आहात.
नवीन सिम कार्डची मागणी
या स्कॅममध्ये सायबर गुन्हेगार सर्वात आधी तुमची माहिती जसे नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा आधार नंबर गोळा करतात. हा डेटा फिशिंग ईमेल, फेक वेबसाइट किंवा लीक डेटाबेसच्या मदतीने एकत्र केला जातो. त्यानंतर स्कॅमर्स तुमच्या मोबाईल नेटवर्क ऑपरेटरला संपर्क करतात आणि तुम्ही बोलत असल्याचे सांगत नवीन सिम कार्डची मागणी करतात. जेव्हा कंपनी तुमच्या मोबाईल नंबरचे नवीन सिम अॅक्टिव्हेट करते, तेव्हा जुने सिम आपोआप बंद होते. अशा पद्धतीने स्कॅमर्सकडे तुमच्या मोबाईल नंबरचे नवीन सिम पोहोचते.
स्कॅमर्सच्या हाती तुमच्या मोबाईल नंबरचे सिम
आता स्कॅमर्स अगदी सहजपणे तुमच्या फोनवर येणारे मेसेज, ओटीपी आणि बँक अलर्ट इंटरसेप्ट करतात. ऑनलाईन अकाऊंटच्या सुरक्षेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओटीपी. जेव्हा स्कॅमर्सच्या हाती तुमच्या मोबाईल नंबरचे सिम लागते तेव्हा ते अगदी सहज हा ओटीपी मिळवू शकतात. याशिवाय तुमच्या बँक अकाऊंटचा पासवर्ड बदलू शकतात आणि ईमेल देखील हॅक करू शकतात. यामुळे तुमचं बँक अकाऊंट अगदी काही क्षणात रिकामं केलं जातं.
मोबाईल ऑपरेटला संपर्क साधा
जर अचानक तुमच्या फोनमधील नेटवर्क गायब झाला किंवा कॉल आणि मेसेज येणं बंदल झाला किंवा पासवर्ड रीसेटचे नोटिफिकेशन आले, तर सावध राहा. ही धोक्याची घंटा आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला असा संदेश मिळतो की तुमचे सिम दुसऱ्या डिव्हाइसवर सक्रिय झाले आहे, हे स्पष्ट संकेत देते की तुमचा नंबर दुसऱ्याच्या ताब्यात आहे. अशावेळी सर्वात आधी तुमच्या मोबाईल ऑपरेटला संपर्क साधा.
असे राहा सुरक्षित
तुमच्या सुरक्षेसाठी तुमच्या मोबाईल अकाउंटमध्ये पिन किंवा पासवर्ड सेट करा, ज्यामुळे कोणीही सिम स्वॅप करू शकणार नाही. फॅक्टर ऑथेंटिकेशनसाठी एसएमएस ऐवजी Google Authenticator चा वापर करा, ज्यामुळे ओटीपी तुमच्याकडे सुरक्षित राहिल. तुमची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करणं टाळा. बँक आणि ईमेल खात्याच्या क्रियाकलापांवर नेहमी लक्ष ठेवा आणि जर नेटवर्क अचानक गायब झाले तर तुमच्या मोबाइल नेटवर्क प्रोवाइडरला त्वरित कळवा.