नुकतेच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी खुलताबादचे नाव 'रत्नपूर' तर दौलताबाद चे नाव 'देवगिरी' करण्यात यावे अशी मागणी केली होती. या मागणीवर एमआयएमचे माजी आक्रमक खासदार इम्तियाज जलील यांनी एका सार्वजनिक भाषणामध्ये एक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यामध्ये देशाचे नाव 'मोदीस्थान' ठेवावे अशी बोचरी टिका त्यांनी केली होती. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे.
इम्तियाज जलील म्हणाले, "तुम्ही सातत्याने गावांची आणि शहरांची नावं बदलताय. मग आता थेट देशाचंच नाव नरेंद्र मोदींच्या नावावर ठेवा. देशाचं नाव मोदीस्थान ठेवा." इम्तियाज जलील यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना हे विधान केलं. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात अनेक शहरांची नावे बदलण्यात आली. उदा. औरंगाबादचे नाव 'छत्रपती संभाजीनगर', उस्मानाबादचं 'धाराशिव' अशा अनेक उदाहरणांचा संदर्भ देत त्यांनी म्हटलं की, "जर नावे बदलूनच देशाचा विकास होणार असेल, तर मग मोदींचं नावच देशाला द्या. मोदी हेच देश, असं म्हणायला सुरुवात करा." या वक्तव्यामुळे भाजप आणि एमआयएम यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप समर्थकांकडून या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत, तर विरोधकांकडून याचे समर्थन करत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहेत.
राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की, "हे वक्तव्य राजकीय असंतोषाचा एक भाग आहे. सत्ताधारी पक्ष ज्या पद्धतीने ठिकाणांची नावे बदलत आहे, त्यावरून जलील यांनी हे टोकाचे विधान केलं आहे. मात्र ते व्यक्तिशः पातळीवर न नेत, यामागचा राजकीय आशय समजून घेणं गरजेचं आहे."