12 जुन रोजी भारतातील अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताचा थरार पुन्हा एकदा ब्रिटनमध्ये पाहायला मिळाला. रुग्णांना ने-आण करणारे बीचक्राफ्ट बी200 सुपर किंग हे विमान उड्डाण करताच क्षणी अचानक कोसळले. या घटनेमुळे अहमदाबादमधील कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
काल दुपारी 4 च्या सुमारास ब्रिटनमधील साउथेंड विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच बीचक्राफ्ट बी200 हे छोटे प्रवासी विमान अचानक खाली कोसळले. विमानामध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळले असा अंदाज वर्तवला जात आहे. हे विमान नेदरलँड्समधील लेलिस्टॅडला जात होते. या विमानाची क्षमता 12 प्रवासी बसू शकतील इतकी होती.
दरम्यान हे विमान कोसळल्यावर मोठमोठे आगीचे डोंब उसळले होते.हा अपघात इतका तीव्र होता की स्फोटाचा आवाज विमानतळ परिसरात मोठ्या अंतरापर्यंत ऐकू गेला.हा अपघात झाल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले. आपत्कालीन सेवा सुद्धा तात्कळ घटनास्थळी पोहोचल्या. या विमानामधून किती लोक प्रवास करत होते तसेच किती जण जखमी झाले आहेत किंवा मृत्युमुखी पडले आहेत त्याबाबत कोणतीही माहिती ब्रिटनच्या स्थानिक प्रशासन आणि विमान वाहतूक प्राधिकरणाकडून प्राप्त झालेली नाही. या विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
खबरदारीचा उपाय म्हणून या विमानतळाचा संपूर्ण भाग सील करण्यात आला आहे. तसेच विमानतळाशेजारी असलेले रग्बी क्लब आणि गोल्फ क्लब हे सुद्धा बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच ब्रिटनच्या प्रवाशांनी सध्या अनावश्यक प्रवास टाळावा आणि विमानतळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सातत्याने अपडेट्स चेक करावे असे आवाहन तेथील प्रवाशांना आणि नागरिकांना करण्यात आले आहे.