भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आजच्या मौद्रिक धोरण बैठकीत सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा देत रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, रेपो दर 5.5 टक्क्यांवरच कायम राहणार असून गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा वैयक्तिक कर्जाच्या हप्त्यांमध्ये तातडीने कोणताही बदल होणार नाही. मौद्रिक धोरण समितीची (MPC) बैठक मंगळवारी पार पडली. बैठकीनंतर RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी प त्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर MPC ने एकमताने रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
गेल्या काही महिन्यांमध्ये RBI ने रेपो दरात टप्प्याटप्प्याने कपात केली होती. फेब्रुवारी, एप्रिल आणि जून या तीन महिन्यांत मिळून एकूण १ टक्क्यांची कपात करण्यात आली होती. यामध्ये जूनमध्ये 0.5 टक्के आणि फेब्रुवारी व एप्रिलमध्ये प्रत्येकी 0.25 टक्क्यांची घट झाली होती.
मल्होत्रा यांनी यावेळी सांगितले की, सध्या मुख्य मुद्रास्फीती 4 टक्क्यांवर स्थिर आहे, तर CPI आधारीत नवीन महागाई दर 3.1 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. याआधी हा दर 3.7 टक्के होता. जीडीपी वाढीचा अंदाज मात्र 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. औद्योगिक वाढीबाबत त्यांनी सांगितले की ती अद्याप काहीशी मंद आणि असमतोल आहे. भू-राजकीय अस्थिरता, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि व्यापारातील बदल यामुळे धोके कायम आहेत. तरीही देशाच्या आर्थिक मूलभूत घटकांमध्ये स्थैर्य आहे.
RBI च्या म्हणण्यानुसार, चालू खात्याचा तुटवडा (Current Account Deficit) सध्या टिकाऊ आणि नियंत्रणात आहे. सार्वजनिक बँकांची भांडवली स्थितीही समाधानकारक असून त्यांच्याकडे पर्याप्त चलन साठा आहे. तसेच, बँक लॉकरमधील वस्तूंवरील दावे सुलभ व्हावेत यासाठी लवकरच नवीन मानकीकृत प्रक्रिया लागू करण्यात येणार असल्याची घोषणाही गव्हर्नर मल्होत्रा यांनी केली.