अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरीफ दर लादण्याची घोषणा केली. या टॅरीफचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो. भारतीय रिझर्व्ह बँक आता व्याजदरात 75 ते 100 बेसिस पॉइंटने कपात करु शकते. त्यामुळे आता कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. आरबीआयच्या 6 सदस्यांच्या पत धोरण विषयक समितीची बैठक फेब्रुवारीमध्ये पार पडली होती. त्यावेळी 25 बेसिस पॉइंटची कपात करण्यात आली होती.
एकूण 50 बेसिस पॉईंटची घसरण ?
आता पुढील आठवड्यात पुन्हा एकदा पत धोरण विषयक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये 25 बेसिस पॉइंटने पुन्हा एकदा कपात होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफमुळं आर्थिक विकासाच्या दरावर 30 बेसिस पॉईंटचा परिणाम होऊ शकतो.अमेरिकेच्या जीडीपीच्या विकासात घसरण, निर्यातीत मंदीमुळं अतिरिक्त 20 बेसिस पॉइंटचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे यामध्ये एकूण 50 बेसिस पॉईंटची घसरण होऊ शकते. भारतावर टॅरिफ कमी असल्यानं इतर देश भारतात कमी दरात विक्री करु शकतात. यामुळे महागाईचा दर कमी राहू शकतो.
आर्थिक वर्षात किती कपात होणार ?
गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार, भारतात 2025 मध्ये महागाईचा दर 4 टक्क्यांच्या खाली राहण्याची शक्यता आहे. हे पाहता आरबीआय या आर्थिक वर्षात एकूण 100 बेसिस पॉईंटची कपात करु शकते. दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत 25-25 बेसिस पॉईंटची कपात केली जाऊ शकते.