काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गुलाम नबी आझाद हे काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. गुलाम नबी आझाद यांचा जम्मू-काश्मीर काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा हा चर्चेचा विषय बनला होता. हे पद मिळाल्यानंतर काही तासांतच त्यांनी प्रकृतीचे कारण सांगून राजीनामा दिला होता. त्यानंतर आता त्यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. आझाद यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचं राजीनामा पत्र पाठवलं आहे. सोनिया गांधींना पाठवलेल्या राजीनाम्याच्या पत्रात गुलाम नबी आझाद यांनी लिहिलं आहे की, "अत्यंत खेदाने आणि अत्यंत भावूक अंत:करणाने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचे माझं 50 वर्षांचं नातं तोडण्याचा निर्णय घेतला आहे." तसंच भारत जोडो यात्रेऐवजी काँग्रेस जोडो यात्रा काढावी, असे त्यांनी सांगितले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसमध्ये सर्वोच्च नेतृत्वाविरुद्ध नाराजी असल्याचे दिसून येत होते. काही ज्येष्ठ नेत्यांनी ही नाराजी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र अद्याप कोणीही असा राजीनामा दिला नव्हता. आझाद यांच्या राजीनाम्यामुळे अन्यही नेते आपली नाराजी राजीनाम्याच्या स्वरुपात व्यक्त करतील, असे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यावेळी केलेल्या आंदोलनात आझाद सहभाही होते. शिवाय त्यांनी पत्रकार परिषदेलाही संबोधित केलं होतं.