भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याने मँचेस्टर कसोटीत दुखापतीनंतरही मैदानात उतरून जबरदस्त झुंजार खेळी केली. उजव्या पायाला लागलेल्या दुखापतीमुळे त्याला पहिल्या दिवशी खेळ सोडावा लागला होता. मात्र दुसऱ्या दिवशी तो पुन्हा फलंदाजीकरता उतरला. यात त्यानं दमदार अर्धशतक झळकावलं.
दुखापतीनंतर पंतनं 37 धावांवरून आपल्या खेळाला सुरुवात करत 54 धावा करत भारतासाठी मोलाची खेळी केली. या डावात त्यानं 75 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांची आतषबाजी केली. या मालिकेतील त्याचे हे तिसरे अर्धशतक ठरले असून त्याने याआधी 2 शतकेही झळकावली आहेत.
सध्या ऋषभ पंतने 7 डावांमध्ये 68.43 च्या सरासरीने एकूण 479 धावा केल्या असून तो मालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च धावसंख्येचा फलंदाज आहे. इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चरने त्याला बाद केल्यानंतर भारताचा डाव 358 धावांवर आटोपला.
बीसीसीआयने अधिकृतपणे जाहीर केलं की, पंतच्या उजव्या पायाला लागलेली दुखापत लक्षात घेता उर्वरित सामन्यात तो यष्टीरक्षण करणार नाही. त्याच्या जागी ध्रुव जुरेल यष्टीरक्षक म्हणून कार्यभार सांभाळेल. ही दुखापत क्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप करताना पंतच्या पायाला चेंडू बसल्यामुळे झाली होती. त्यानंतर त्याला स्कॅनसाठी नेण्यात आलं होतं.
भारत सध्या पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा पिछाडीवर आहे. मँचेस्टर कसोटीत प्रथम फलंदाजी करत भारताने पहिल्या दिवशी 4 बाद 264 धावा केल्या होत्या.
हेही वाचा