महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पाटील यांनी रविवारी विधानसभेत पदाची शपथ घेतली. विधानसभेतील त्यांची आमदार म्हणून ही पहिली एन्ट्री. आमदारकीची शपथ घेऊन त्यांनी इतिहास तर घडवलाच पण त्यांच्या सभागृहात येण्याने अनेकांना त्यांचे वडील आर. आर. पाटील म्हणजेच आरआर आबांची आवठण झाली.
रोहित पाटील हे देशातील सर्वात तरुण आमदार ठरले आहेत. तसेच ते सर्वात तरुण मुख्य प्रतोद म्हणूनही काम करणार आहेत. रविवारी त्यांनी विधानसभेच्या सभागृहात आमदारकीची शपथ घेतली. याच दिवशी दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 8 डिसेंबर 2014 हा दिवसापासून आर. आर. पाटील विधिमंडळात कधीच दिवसले नाहीत. दहा वर्षांनंतर याचदिवशी त्यांच्या लेकानं आमदारकीची शपथ घेतली.
रोहित पाटील यांनी शपथ घेतल्यानंतर हा योगयोग म्हणायचा की नियतीचा खेळ, अशीच भावना अनेकांची होती. आर. आर. पाटील यांनी 7 डिसेंबर 2014 रोजी विधानसभा अध्यक्षांना लिहिलेले पत्र समोर आले आहे. या पत्रामध्ये त्यांनी 8 डिसेंबरपासून अधिवेशनात अनुपस्थित राहण्याची परवानगी मागितली होती.
आर.आर. पाटलांनी लिहिलेलं पत्र
प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यामुळे मला दि. 8 डिसेंबर 2014 पासून नागपूर येथे सुरु होणाऱ्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरूवातीचे काही दिवस उपस्थित राहता येणार नाही. तरी सभागृहात अनुपस्थित राहण्यास अनुमती मिळाली, ही विनंती.