एक रुपयात मिळणारा पीकविमा बंद होण्याची शक्यता आहे. बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त ठरलेली एक रुपयातील पीकविमा योजना बंद करावी, अशी महत्त्वपूर्ण शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने सरकारला केली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, बोगस अर्जांमुळे तसेच गैरव्यवहारांमुळे ‘एक रुपयात 'पीकविमा योजना’ बंद करण्याचा विचार करणे म्हणजे ‘उन्हात पाय भाजतात म्हणून पायात चप्पल घालण्याऐवजी संपूर्ण पृथ्वीवर चामडे अंथरण्यासारखे आहे’. त्यामुळे काही ठराविक लोकांच्या चुकीमुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दंड देणे योग्य होणार नाही.
मुळात आज तंत्रज्ञान एवढे प्रगत असताना बोगस अर्ज येतातच कसे? ज्याप्रमाणे ott प्लॅटफॉर्मवर एका स्क्रीनचे सबस्क्रीप्षण असेल तर दुसऱ्या स्क्रीनवर login करताच येत नाही तर मग त्याचप्रमाणे शासनाकडे शेतकऱ्यांचे आधार कार्ड, ७/१२ उतारे यांचे सर्व डिटेल्स असताना बोगस अर्ज का ओळखता येऊ शकत नाहीत?
यासोबतच ते पुढे म्हणाले की, पीकविमा कंपन्या, कृषी विभागाचे अधिकारी यांच्या संगनमताशिवाय बोगस अर्ज दाखल होऊच शकत नाही. त्यामुळे या योजनेसंदर्भात निर्णय घेताना एकांगी विचार न करता व्यापक, चोहोबाजुनी विचार करूनच शासनाने निर्णय घ्यावा, ही विनंती. असे रोहित पवार म्हणाले.