कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलं आहे. कांद्याच्या बाजारभावावरून बोलताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, "कांद्याची लागवड आणि निर्यांतबंदी हे दर वर्षाला बदलतं सूत्र आहे. एखाद्या शेतकऱ्याला 2-५ हजार रुपये भाव कांद्याला मिळाला म्हणजे गावातील सर्व शेतकरी कांदेच करत सुटतात हा पण चुकीचा संदेश आहे. त्यामुळे आपल्याला किती कांदा करायला मर्यादा आहे की नाही दुप्पट का तिप्पट. तुम्ही जर 50 पट कांदा करायला लागले तर 50 पट गेल्यावरती भाव पडणारच. त्यामुळे किती लागवड करावी आणि कशी करावी या संदर्भातलं मार्गदर्शन सरकारने करणं अपेक्षित आहे."
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, "कांद्याला चांगला भाव मिळाला की शेतकरी कांदाच लावत सुटतात आणि कांद्याचे भाव पडतात हा तर्क आहे महाराष्ट्र राज्याचे महान कृषिमंत्री कोकाटे साहेबांचा! कांद्याचे दर थोडेफार उत्पादन वाढल्याने पडत नाहीत तर केंद्र सरकारच्या निर्यातबंदी, निर्यातशुल्क यासारख्या धोरणांमुळे आणि झोपलेल्या राज्यसरकारमुळे पडतात. त्यामुळे राज्याच्या कृषिमंत्र्यांनी आपले ब्रम्हज्ञान शेतकऱ्यांना देण्याऐवजी केंद्र सरकारला दिले तर अधिक बरे होईल."
तसेच ते पुढे म्हणाले की, " कृषिमंत्री पद हे अत्यंत जबाबदारीचे पद आहे, परंतु विद्यमान कृषिमंत्र्यांना मात्र त्यांची जबाबदारी अजूनही समजलेली दिसत नाही, त्यामुळे नेतृत्वाने कृषिमंत्र्यांची राजकीय काळजी करण्यापेक्षा शेतकऱ्यांची काळजी करावी. अजितदादांनी धाडसी निर्णय घेऊन ज्याला शेतीची समज आहे, संवेदना आहे अशा जबाबदार व्यक्तीकडे कृषिमंत्री पद सोपवायला हवे." असे रोहित पवार म्हणाले.