Rohit Pawar : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार मतदारसंघातल्या एका आढावा बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांवर संतापल्याचं पाहायला मिळालं... इतर वेळी अत्यंत शांत आणि संयमीपणे बोलणारे रोहित पवार अचानक आक्रमक झाले आणि त्यांनी एका अधिकाऱ्याची भरसभेत चांगलीच कानउघडणी केली. नेमकं काय घडलं या आढावा बैठकीत आणि रोहित पवार एवढे का चिडले, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
आमदार रोहित पवार यांची पोलिसांसोबत झालेली बाचाबाचीचं प्रकरण ताजं असतानाच त्यांच्या आक्रमकतेचा आणखी व्हिडिओ व्हायरल झालाय... जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या आमसभेत शासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी नागरिकांनी जामखेड नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या गटार योजनेत ठेकेदारांकडून होत असलेले निकृष्ट दर्जाचे काम उघड केले. तक्रारींसंदर्भात अधिकाऱ्यांकडून मोघम उत्तरं मिळताच आमदार रोहित पवारांचा पारा चढल्याचं पाहायला मिळालं...
रोहित पवारांनी अधिकाऱ्याला आक्रमकपणे फटकारल्यानंतर सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. नागरिकांनीही आमदारांच्या भूमिकेला जोरदार दाद दिली. पैसा जनतेचा आहे, काम जबाबदारीने झालंच पाहिजे. बेफिकीर वृत्ती सहन केली जाणार नाही,असा स्पष्ट संदेश रोहित पवार यांनी प्रशासनाला दिला आहे. यावर आता सत्ताधारी काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.