ताज्या बातम्या

Rohit Pawar : दावोस दौऱ्यापूर्वीच रोहित पवारांचा टोला; ‘जागतिक कंपन्या महाराष्ट्राऐवजी इतर राज्यांत का?’

महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा लवाजमा आजपासून दावोस दौऱ्यावर रवाना होत

Published by : Varsha Bhasmare

महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा लवाजमा आजपासून दावोस दौऱ्यावर रवाना होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर खोचक टोला लगावला आहे. दावोस दौऱ्यापूर्वीच त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करत जागतिक दर्जाच्या नामांकित कंपन्या महाराष्ट्राऐवजी इतर राज्यांकडे का वळत आहेत? असा थेट सवाल उपस्थित केला आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये Disney आणि Honeywell या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा उल्लेख केला आहे. Disney ही मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कंपनी असून Honeywell ही सायबर सिक्युरिटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक अग्रणी कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांनी भारतातील विस्तारासाठी बंगळुरुतील बेलंदुर परिसराची निवड केल्याचे त्यांनी नमूद केले. Disney ने येथे १ लाख ७४ हजार चौरस फूट जागा भाड्याने घेतली असून Honeywell ने तब्बल ४ लाख चौरस फूट कार्यालयीन जागा सात वर्षांसाठी घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

इतक्यावरच न थांबता रोहित पवार यांनी इतर उदाहरणेही पुढे आणली आहेत. Deloitte या आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपनीने मंगलुरु येथे ५० हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याची घोषणा केली आहे, तर Maruti Suzuki कंपनी गुजरातमध्ये ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून नवा प्लांट उभारत आहे. मुंबई आणि महाराष्ट्र देशाचे आर्थिक इंजिन मानले जात असताना, तसेच राज्यात बेरोजगारी वाढत असताना, अशा मोठ्या कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक का करत नाहीत, असा प्रश्न त्यांनी एक सामान्य नागरिक म्हणून उपस्थित केला आहे.

दरम्यान, आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाच दिवसीय दावोस दौऱ्यावर जात असून ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत सहभागी होणार आहेत. १९ ते २३ जानेवारीदरम्यान ते दावोसमध्ये असतील. मागील वर्षी राज्य सरकारने सुमारे १६ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यापैकी ७२ टक्के करार प्रत्यक्षात उतरल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. यंदाही तितक्याच मोठ्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी अपेक्षा व्यक्त करत म्हटले आहे की, मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांनी दावोसमध्ये शर्थीचे प्रयत्न करून जागतिक दर्जाच्या कंपन्यांची गुंतवणूक महाराष्ट्रात आणावी, जेणेकरून राज्यातील बेरोजगार तरुणांना दिलासा मिळेल. त्यांच्या या ट्विटमुळे दावोस दौऱ्याआधीच राज्याच्या औद्योगिक धोरणावर आणि गुंतवणूक वास्तवावर राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा