छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी रुग्णालय) येथे राज्यभरातून विविध जिल्ह्यांतील रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, येथे वास्तव्यास असलेल्या रेसिडेंट डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. मंगळवार, ८ एप्रिल रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या पोर्चचे छत अचानक कोसळले. या घटनेमुळे रेसिडेंट डॉक्टर आणि भावी डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर नव्याने प्रकाश पडला आहे. छताचा भाग कोसळताना मोठा आवाज झाला. त्यामुळे विद्यार्थी घाबरून गेले. काही विद्यार्थ्यांनी तत्काळ सुरक्षितस्थळी धाव घेत आपले संरक्षण केले.
दुरुस्तीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष?
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, "वसतिगृहातील सुविधा व समस्यांबाबत प्रशासनाला वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, योग्य प्रतिसाद मिळालाच नाही. अशा स्थितीतच ही गंभीर घटना घडली."
विद्यार्थ्यांचे आरोप, प्रशासनाची हलगर्जी
"जर ही घटना मुख्य छताची असती, तर मोठी दुर्घटना घडली असती. आम्ही आमचे भविष्य घडवण्यासाठी आलो आहोत, पण येथे जीव मुठीत घेऊन राहतोय," अशी प्रतिक्रिया एका वैद्यकीय विद्यार्थ्याने दिली. त्यांनी वसतिगृहाची तातडीने डागडुजी करून सुरक्षित निवास व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.
शासनासाठी आत्मपरीक्षणाची वेळ
जे विद्यार्थी इतरांचे आरोग्य आणि जीवन वाचवण्यासाठी प्रशिक्षित होत आहेत, त्यांच्याच आयुष्याला धोका निर्माण होतोय, ही शासनासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आहे. अशा घटना रोखायच्या असतील, तर केवळ प्रतिक्रियांनी चालणार नाही; ठोस कृती गरजेची आहे, असे मत विद्यार्थ्यांनी मांडले आहे.