राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी दिलासादायक बातमी असून ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana) यंदाच्या महिन्यातील १५०० रुपयांचा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून अनेक लाडक्या बहिणींच्या मोबाईलवर बँक मेसेज येऊ लागले असून, महिलांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना या योजनेच्या लाभाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिल्यानंतर नियमित किंवा प्रलंबित लाभ देण्यास परवानगी देण्यात आली आहे. तथापि, जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास आयोगाने स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ताच सध्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे.
दरम्यान, “लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट देत १४ जानेवारीपूर्वी डिसेंबर व जानेवारी महिन्याचे मिळून ३००० रुपये जमा होणार,” अशा आशयाच्या बातम्या व सोशल मीडियावरील दाव्यांमुळे राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आयोगाने शासनाकडून वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी स्पष्टीकरण मागवले होते. राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आले की, ४ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेचे एकत्रित आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशांनुसार निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सुरू झालेल्या योजना आचारसंहिता काळात सुरू ठेवता येतात. मात्र, कोणताही नवीन लाभ, अग्रिम हप्ता किंवा नवीन लाभार्थी निवडण्यास मनाई आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, ‘लाडकी बहीण’ योजनेचा नियमित लाभ देता येईल; परंतु ३००० रुपये एकत्र देणे किंवा नवीन लाभार्थी निवडणे आचारसंहितेचा भंग ठरेल. त्यामुळे, १५ जानेवारी रोजी होणाऱ्या २९ महानगरपालिका निवडणुकांच्या दोन दिवस आधीच महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. विरोधकांकडून मकर संक्रांतीच्या दिवशी निधी वितरणावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, आयोगाच्या निर्देशांनंतर आता हा संभ्रम दूर झाला असून, आदर्श आचारसंहितेच्या कात्रीत अडकलेली योजना अखेर नियमांच्या चौकटीत मार्गी लागली आहे.