पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील स्वारगेट स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने गोड-गोड बोलून पीडित तरूणीला आपल्या जाळ्यात ओढले आणि नंतर बसमध्ये गेल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या सगळ्या प्रकाराने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. यावरच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या की, पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर काल सकाळी एका तरुणीवर बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना, या अनुषंगाने मी स्वतः पोलीस आयुक्त तसेच तपास अधिकारी या सगळ्यांशी बोलले आहे. सीसीटीव्ही फुटेजही मी स्वतः पाहिले आहे. ही तरुणी आरोपी सोबत काही वेळ बोलत होती आणि त्याने तिची दिशाभूल करून, तिला खोटं सांगून बस मध्ये नेलं आणि अत्याचार केला. ती मुलगी काही वेळ त्याच्याशी बोलताना सीसीटीव्हीत दिसत आहे तर अनोळखी व्यक्तींशी बोलताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. शासकीय यंत्रणा, चौकशी कक्ष हे मदतीला असतातच तर त्यांच्याशी संवाद साधायला हवा होता. मात्र दुर्दैवाने या मुलीने अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि पुढे हा गंभीर आणि वेदनादायी प्रसंग घडला. पोलिसांनी ८ तपास पथक तयार केली आहेत, आठ तपास पथक या सगळ्यांचा कालपासून तपास करत आहेत. आरोपीचा सीडीआर काढला असून लोकेशन मिळेल आणि आज किंवा उद्या आरोपीला अटक होईल. मात्र माझ आवाहन आहे की तरुण मुलींनी, महिलांनी सार्वजनिक जीवनात वावरताना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. यंत्रणांची मदत घ्यावी, स्वतःची काळजी घ्यावी. माणसांच्या कळपात हिंस्त्र श्वापदे वावरतात,त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे,आपण सतर्क रहावे. आता या प्रकरणात या पीडित मुलीच समुपदेशन व तसेच जलद तपासासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
स्वारगेट येथील बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, सदर पीडित तरुणीला आरोपी जबरदस्तीने बसमध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर अतिप्रसंग केले आहेत. ही घटना मंगळवारी रात्री घडल्याचे समोर आले. पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार दाखल केली असून आता आरोपीचा तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी ही स्वारगेटवरुन फलटणला जात होती. तेव्हा आरोपींनी तरुणीला फलटणला जाणारी बस आहे असं सांगून दुसऱ्या बसमध्ये जायला सांगितले. तिथेच तिच्यावर अत्याचार करण्यात आला. आरोपीचे वय 36 वर्षे इतके असून त्याच्यावर शिक्रापूर इथे गुन्हे दाखल आहेत. आरोपीच्या शोधासाठी आठ पथके रवाना झाली आहेत.