वैद्यकीय क्षेत्रातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी कॅन्सरवरील लस बनवण्याचा दावा केला आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयातील रेडियोलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे डायरेक्टर अँड्री कॅप्रीन (Andrey Kaprin) यांनी रेडिओवर ही घोषणा केली आहे. रशियन वृत्तसंस्था TASS च्या वृत्तानुसार ही लस २०२५ साली नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिली जाईल.
mRNA वॅक्सिन ही कॅन्सरवरील आपण विकसित केली असल्याचं डायरेक्टर अँड्री कॅप्रीन (Andrey Kaprin) यांनी म्हटलं आहे. रशियाचा हा दावा खरा ठरला तर हा या शतकातील सर्वात मोठा शोध ठरू शकतो. या लशीच्या क्लिनिकल ट्रायल वेळी असं निरिक्षण नोंदवलं गेलं की या लशीमुळे ट्युमरची वाढ रोखता येते. २०२४ सालाच्या सुरुवातीलाच रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी आपण कॅन्सरवरील लस बनवण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो असं वक्तव्य केलं होतं.
mRNA लस काय आहे?
mRNA हे मानवी जनुकांच्या कोडचा एक छोटासा भाग आहे. जो आपल्या पेशींमध्ये प्रथिनं तयार करतो. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा आपल्या शरीरात व्हायरस किंवा बॅक्टेरियाचं संक्रमण होतं, तेव्हा mRNA हे आपल्या पेशीमध्ये व्हायरस किंवा बॅक्टेरियाशी लढण्याचे प्रथिनं तयार करण्याचा संदेश देतं.
यामुळे आपल्या रोगप्रतिकार प्रणालीला आवश्यक ते प्रथिनं मिळतात. आणि आपल्या शरीरात एँटीबॉडी तयार होतात. यामुळे कन्वेंशनल वॅक्सिनपेक्षा जास्त जलद वॅक्सिन बनवणं शक्य होतं. तसेच यामुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढते. mRNA या प्रणालीवर आधारित ही पहिली लस आहे.