थोडक्यात
युक्रेनमध्ये रशियाचा मोठा हल्ला
या घटनेनंतर मोठे नुकसान झाले आहे.
रशियाच्या या हल्ल्यात एका मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला.
किमान 18 नागरिक जखमी झाले आहेत.
युक्रेन आणि रशियामधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांना यश आले नसून उलट तणाव अधिकच वाढताना दिसत आहे. रशियाने रविवारी युक्रेनची राजधानी कीवमध्ये थेट मंत्री परिषदेच्या इमारतीवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे मोठा हल्ला केला. या घटनेनंतर मोठे नुकसान झाले असून जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.
रशियाच्या या हल्ल्यात एका मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला असून किमान 18 नागरिक जखमी झाले आहेत. हल्ल्यामुळे इमारतीत आग लागली होती, ज्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. संबंधित इमारतीत मंत्रींची कार्यालये तसेच निवासस्थाने असल्यामुळे हा हल्ला थेट सरकारच्या उच्च पातळीवर होता, असा दावा स्थानिक अधिकाऱ्यांनी केला आहे.
अमेरिका सातत्याने युक्रेन आणि रशियाच्या युद्धात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारताने स्पष्ट केले आहे की या संघर्षात शांततेसाठी भूमिका ठाम आहे आणि कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. तरीसुद्धा, रशियाच्या या हालचालींमुळे युद्ध थांबण्याऐवजी अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन आठवड्यांतील कीववरील हा दुसरा मोठा हल्ला मानला जातो. काही दिवसांपूर्वी रशियाने अमेरिकन कंपनीलाही लक्ष्य केले होते, ज्यावरून अमेरिका आक्रमक भूमिका घेऊ लागली होती. आता मात्र सरकारी इमारतींवर थेट हल्ला झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढे युक्रेन यावर कसा प्रतिहल्ला करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.