Saamana Editorial महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटला असून, शिवसेना (ठाकरे गट)चे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाने आजच्या अग्रलेखातून फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. सामनाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर “वडापाव आणि झुणका-भाकरीचा द्वेष” असल्याचा आरोप करत, हे वक्तव्य मराठी माणसाच्या कष्ट, रोजगार आणि स्वाभिमानाचा अपमान करणारे असल्याचे म्हटले आहे.
अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे की, मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातकडे वळत असताना मुख्यमंत्री रोजगार देण्याच्या घोषणा करत आहेत, मात्र प्रत्यक्षात हजारो तरुणांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या वडापाव उद्योगाला कमी लेखले जात आहे. वडापाव हा केवळ खाद्यपदार्थ नसून, मुंबईतील कष्टकरी, कामगार आणि तरुणांसाठी रोजगाराचे मोठे साधन असल्याचा दावा सामनाने केला आहे. मराठी माणसाचा वडापाव आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असताना, त्याचा अभिमान बाळगण्याऐवजी त्याची खिल्ली उडवली जात असल्याची टीका अग्रलेखात करण्यात आली आहे.
सामनाने तुलना करत म्हटले आहे की, दक्षिण भारतात इडली-डोसा, बिहारमध्ये लिट्टी-चोखा, दिल्लीत कचोरी-समोसा, पंजाबमध्ये मिस्सी रोटी आणि लस्सी, तर कर्नाटकात बेन्ने डोसा यांचा अभिमान बाळगला जातो. मात्र महाराष्ट्रात झुणका-भाकरी आणि वडापावसारख्या स्थानिक खाद्यसंस्कृतीकडे तुच्छतेने पाहिले जाते, हे दुर्दैवी असल्याचे मत अग्रलेखात व्यक्त करण्यात आले आहे.
शिवसेनेच्या स्थापनेच्या काळातील संदर्भ देत सामनाने म्हटले आहे की, जेव्हा मराठी तरुणांना नोकऱ्यांपासून दूर ठेवले जात होते, तेव्हा स्वावलंबनाचा मार्ग म्हणून वडापावच्या गाड्यांचा पर्याय देण्यात आला. त्यातूनच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती झाली आणि वडापाव मुंबईची ओळख बनला. आज पंचतारांकित हॉटेलांपासून परदेशांपर्यंत वडापाव पोहोचला आहे, हे विसरून चालणार नाही, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. दरम्यान, या अग्रलेखानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, भाजपकडून यावर प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. वडापाव आणि झुणका-भाकरीसारख्या विषयांवरून सुरू झालेली ही चर्चा आता मराठी अस्मिता, रोजगार आणि उद्योगांच्या मुद्द्यांशी जोडली जात असल्याचे चित्र आहे.