तब्बल 70वर्षांनंतर राजधानी दिल्लीमध्ये फेब्रुवारी 2025मध्ये होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकृतरीत्या निमंत्रित करण्यात आले आहे. दिल्लीमध्ये होत असलेल्या आगामी 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
त्यामुळे संमेलनाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी हे निमंत्रण स्वीकारल्यास सुरक्षेच्या दृष्टीने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विज्ञान भवनात उद्घाटन सोहळा करण्याचे नियोजन आहे.केंद्र सरकारने 3ऑक्टोबरला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. शिवाय शरद पवार स्वागताध्यक्ष असतील तर संमेलनाच्या मंचावर ‘राजकीय संतुलन’ साधण्यासाठी उद्घाटक म्हणून पंतप्रधानांना बोलवावे, अशी मागणी पुढे आली होती.
साहित्य महामंडळाचीही तशीच इच्छा होती. याची ‘दखल’ शरद पवार यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून संमेलनाच्या उद्घाटनासाठी निमंत्रित केले आहे. पंतप्रधानांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे की नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मात्र मोदी येणार असतील तर बैठक व्यवस्थेत करावे लागणारे बदल, या सर्व बाबी लक्षात घेता उद्घाटन सोहळा विज्ञान भवनात करायचा व प्रसारण तालकटोरा मैदानातील संमेलनस्थळी करायचे, असा पर्याय आयोजकांनी सुचवला आहे. 1954साली दिल्लीत साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते झाले होत.