महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची प्रमुख भूमिका असलेला 'देवमाणूस' चित्रपट येत्या 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची निर्मिती लव फिल्म्सच्या लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली असून तेजस देऊस्कर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ बोडके खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील लावणी गाणं नुकतचं सोशल मीडियावर लाँच झालं आहे. हे गाण बोल्ड, बिनधास, ब्युटिफुल अभिनेत्री सई ताम्हणकरवर चित्रीत झालं आहे.
'आलेच मी' या गाण्यातून सईने नृत्याविष्कार सादर केला आहे. पारंपरिक मराठी संगीतसृष्टीत आपली खास ओळख असणाऱ्या बेला शेंडे यांच्या दमदार आवाजात हे गीत साकारण्यात आले असून रोहन प्रधान यांनी त्यांना साथ दिली आहे. रोहन-रोहन यांचे संगीत लाभलेले हे गाणे तेजस देऊस्कर यांनी लिहिले असून रोहन गोखले यांनीही अतिरिक्त गीतलेखन केले आहे. सुप्रसिद्ध लावणी तज्ज्ञ नृत्यदिग्दर्शक आशीष पाटील यांनी या गाण्याची नृत्यरचना केली आहे.