बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरी एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अभिनेता गंभीर जखमी झाला असून सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता त्याच्या प्रकृतीबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. यासंदर्भात लिलावती रुग्णालयाचे सीओओ यांनी माहिती दिली आहे.
सैफच्या प्रकृतीबद्दल लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. नीरज उत्तमणी यांनी सांगितले की, सैफ अली खानवर एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या घरात घुसून हल्ला केला. त्यानंतर सैफला मध्यरात्री 3.30 वाजण्याच्या सुमारास लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्याच्या शरीरावर तब्बल सहा जखमा असून त्यातील दोन जखमा खोलवर आहेत. एक जखम त्याच्या मणक्याजवळ झाली आहे. सैफच्या शरीरात चाकूचा तुकडा देखील आढळला आहे. त्यामुळे आता सैफची ही जखम किती खोलवर आहे, याची तपासणी सध्या सुरु आहे. याशिवाय सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
त्यांच्यावर सध्या कन्सल्टंट न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे, कन्सल्टंट प्लास्टिक सर्जन डॉ. लीना जैन, कन्सल्टंट अॅनेस्थेसियोलॉजिस्ट डॉ. निशा गांधी, इंटेन्सिव्हिस्ट डॉ. कविता श्रीनिवास, कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट डॉ. मनोज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया सुरू आहे. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किती दुखापत झाले आहे हे समजून येईल.